कुटुंब आणि सुहृदांची मनोगते

साहित्यिक जीवन

सामाजिक बांधिलकी मानणारे न्यायमूर्ती : नरेन्द्र चपळगावकर – डॉ. सुधीर रसाळ

माझी आणि नरेन्द्र चपळगावकरांची गेल्या पासष्ट वर्षांपासून मैत्री आहे. आम्ही एक़मेकांना सुख-दु:खाच्या अनेक प्रसंगांतून जाताना पाहिले आहे आणि एकमेकांना साथही दिली आहे. आमच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही दोघांनी एकमेकांशी चर्चा करून घेतले आहेत. त्यामुळे चपळगावकर आतापर्यंत कशासाठी आणि कसे जगत आले,

अपेक्षा ध्रुवताऱ्याच्या दिशेची – डॉ. सदानंद बोरसे

न्यायमूर्ती (निवृत्त) नरेन्द्र चपळगावकर यांची वर्धा येथे भरणाऱ्या शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व साहित्यप्रेमींसाठी एक आनंददायी घटना.
‘संमेलनाध्यक्ष कोण होणार?’ या प्रश्नापासून सुरू होणारी मोहीम निरनिराळी वळणे घेत एका नावावर स्थिरावते.

संयमी तरीही स्पष्ट. . . . ! – राधाकृष्ण मुळी

शिक्षक आणि प्राध्यापक, वकील आणि न्यायाधीश, कार्यकर्ते आणि पदाधिकारी, पत्रकार आणि संपादक,  वक्ते आणि लेखक अशा भूमिकेत वावरत आलेले नरेन्द्र चपळगावकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. संमेलन विदर्भात, वर्ध्यात  होत आहे, तेव्हा दोन-तीन  योगायोगांचा उल्लेख सुरुवातीलाच करायला हवा. चपळगावकर महाविद्यालयीन शिक्षणासाठी वर्षभर का होईना अमरावतीत होते.

आपुलकीने वागणारा थोर माणूस – ॲड. सुधीर बारलिंगे

‘‘सर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन. आज संध्याकाळी भेटण्यासाठी कुठली वेळ आपल्या सोयीची आहे?”
‘‘बाळ, तुला वेळ घेण्याची गरज काय? तू केव्हाही येऊ शकतोस.”
हा संवाद फोनवर झाला. संध्याकाळी मी आमच्या ‘साहेबांना’ भेटायला गेलो.

प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी

महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्याची म्हणूनही न्यायमूर्तीची एक प्रभावळ आहेच. जुन्या हैदराबाद संस्थानातील न्या. कोरटकर, न्या. एकबोटे आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरचे न्या. व्यंकटराव देशपांडे, न्या. कुडूकर, न्या. कानडे यांच्यानंतर नाव घ्यावे लागते ते चपळगावकर यांचेच. बीड जिल्ह्याने उच्च न्यायालयाला न्यायमूर्तीची पूर्तता करण्यात कसलेच उणेपण ठेवले नाही. न्यायमूर्तीपदाच्या त्या ताजव्याला तोलून धरताना न्याय, विवेक ढळू न देता आचरण करणाऱ्या नरेन्द्र चपळगावकर या नावाला म्हणूनच मोल आहे. दबदबा, अधिकार, सन्मान व मानमरातब या पलीकडेही भल्या- बुऱ्यासह एक सामान्य माणूस असतो, याची जाण जागती ठेवणारा, माणुसकी हेच मूल्य प्रमाण मानणारा, संवेदनशील लेखक म्हणून चपळगावकर वेगळे ठरतात.

प्रा. ग. प्र. प्रधान

नरेन्द्र चपळगावकर यांनी ‘राज्यघटनेचे अर्धशतक’ एक अत्यंत उद्बोधक आणि विचारप्रवर्तक पुस्तक लिहिले. जाणकारांनी त्याचे मनःपूर्वक स्वागतही केले.
चपळगावकरांचे वैशिष्ट्य हे, की त्यांचा आजवरचा व्यासंग, वकील व न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव यांच्या आधारे त्यांनी भारतीय संविधानावर ज्याप्रमाणे दोन ग्रंथ लिहिले, त्याचप्रमाणे त्यांनी सर्वसामान्य वाचकांसाठी ‘कायदा आणि माणूस’ या सदरातून नियमित लिहिले.
त्यांनी सामान्य माणसाला कायद्याच्या दुनियेचे जे दर्शन घडविले आहे, ते वस्तुस्थितीनिदर्शक आहे आणि महत्त्वाच्या समस्यांचे रेखीवपणे विवरण करणारेही आहे.

कौटुंबिक लेख

आठवले तसे – नंदिनी चपळगावकर

मला माझ्या आयुष्यातील कितीतरी गोष्टी आठवतात, अगदी वयाच्या पाचव्या वर्षांपासून! मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील परळी- अंबाजोगाईसारख्या तेव्हाच्या गावात माझे बालपण आणि लग्नापूर्वीचे आयुष्य गेले. मी पांडे या अंबाजोगाईच्या वतनदार घरातील. मला तेव्हाचे ते वाडे, वाड्यातील अनेक एकत्र कुटुंबे, त्यांचे संसार, जीवाभावाची माणसे, परिस्थितीचे हेलकावे, या हेलकाव्यांचे जगण्यावर आणि परस्पर संबंधांवर होणारे परिणाम, कुटुंबातील रागलोभ असा कितीतरी तपशील आठवतो.

बाबा आणि मी – सायली राजाध्यक्ष

माझ्या लग्नाला आता दहा वर्षं होतील. पण अजूनही माझा आणि बाबांचा रोज एक फोन असतोच. बरं, आम्ही फोनवर बोलतो ते काही महत्त्वाचे विषय नसतात, अगदी ‘आज तुम्ही काय जेवलात? कुठे गेला होता? दिवसभरात काय काय घडलं?’ अशा अगदी साध्या बाबींवर आमचं बोलणं होतं. पण रोज एक फोन हा व्हायला हवाच! मला, निरंजन – माझा नवरा तर म्हणतो की, तुम्ही एक फॅमिली न्यूजलेटर का नाही काढत, कारण रोज तेच तेच बोलत असता! पण खरं सागायचं तर दहा वर्षं झाली, तरी अजून रोज बाबांशी बोलल्याशिवाय करमतच नाही.

आमच्या ‘उत्कट’ जगण्याला बाबांच्या ‘उत्तुंगते’ची किनार आहे! – भक्ती चपळगावकर

माझ्या आई-बाबांना चार मुलं. आम्ही चौघंही स्वभावानं अगदी वेगळे आहोत. पण तरीही आम्हा मुलांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत. आम्ही माणसांमध्ये रमतो, आमच्या आजुबाजूला असलेल्या लोकांना काही अडचणी असतील तर आम्ही त्या आमच्याच अडचणी आहेत, असं मानून चालतो.

मोठा… तरीही साधा माणूस – मेघना चपळगावकर

कोणालाही नाव सांगितलं की, पहिली प्रतिक्रिया असते – ‘‘तुम्ही नरेन्द्र चपळगावकरांच्या कोण?” इतकं वलय आहे बाबांच्या नावाला! यात त्यांच्या व्यासंगाबरोबरच लोकसंग्रहाचा मोठा भाग आहे. पण त्यांच्या या वलयाचा फायदा घ्यायची आमची हिंमत नव्हती आणि नाही, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाबा.
बाबांना काय आवडणार नाही याची जाणीव बाबांच्या वागण्यातून फार लहानपणापासून आमच्या मनावर बिंबली आहे. त्यांनी त्यांच्या स्थानाचा कधीही फायदा घेतलेला आम्ही पाहिला नाही.