साहित्यिक जीवन

सुधीर रसाळ (सामाजिक बांधिलकी मानणारे न्यायमूर्ती : नरेंद्र चपळगावकर )

माझी आणि नरेन्द्र चपळगावकरांची गेल्या पासष्ट वर्षांपासून मैत्री आहे. आम्ही एक़मेकांना सुख-दु:खाच्या अनेक प्रसंगांतून जाताना पाहिले आहे आणि एकमेकांना साथही दिली आहे. आमच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही दोघांनी एकमेकांशी चर्चा करून घेतले आहेत. त्यामुळे चपळगावकर आतापर्यंत कशासाठी आणि कसे जगत आले, हे जवळून पाहणारा मी त्यांचा मित्र आहे. त्यांच्याबद्दल लिहिताना मी त्यांचा उल्लेख त्यांच्या सर्वपरिचित नावाने करणार नाही. कारण त्या नावाने संबोधित करून मी त्यांच्याविषयी लिहूच शकणार नाही. तेव्हा मी त्यांचा उल्लेख त्यांच्या घरगुती ‘नाना,’ या नावाने करणार असून तो एकेरी स्वरूपाचा असेल.
नानाचे वडील पुरुषोत्तमराव हे बीड येथे वकिली करत. हैदराबाद मुक्तिसंग्राम सुरू झाल्यावर आपली वकिली गुंडाळून ते या लढ्यात सामील झाले. वकिली थांबल्यामुळे घरचे उत्पन्न कमी झाले. नानाच्या कुटुंबाने दहाएक वर्षे दारिद्य्राच्या झळा सोसल्या. हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यावर काही वर्षे पुरुषोत्तमराव राजकारणात सक्रिय होते. परंतु आता आपल्यासारख्यांना राजकारणात स्थान नाही हे लक्षात येताच त्यांनी राजकारण पूर्णपणे सोडले. हैदराबाद संस्थानचा मुक्तिलढा म. गांधींशी होणाऱ्या विचारविनिमयाने चालवला जात होता. तेव्हा या लढ्यातल्या कार्यकर्त्यांवर म. गांधींचा फार मोठा प्रभाव होता. पुरुषोत्तमरावही पक्के गांधीवादी होते. त्यामुळे त्यांची वकिली गांधीतत्त्वांनुसार चालत असे! आशील केस घेऊन त्यांच्याकडे आला की, ते त्याला परस्परांत

बोलणी करून तंटा मिटवण्याचा सल्ला देत. ज्याच्या केसमध्ये जिंकण्याचा जर अजिबात संभव नसेल तर ‘तू खटला भरण्याच्या भानगडीत पडू नकोस’ असे स्वच्छ सांगत.
मग तो इसम दुसऱ्या वकिलाकडे जाई आणि प्रचंड पैसा खर्चून केस हरून येई. शाळेत शिकणाऱ्या नानावर वडिलांच्या वकिलीपद्धतीचा संस्कार झाला आहे.
शाळेत असताना नानाचे लक्ष अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींकडे असे. विशेषत: अभ्यास सोडून पुस्तके वाचण्यात तो रमून जात असे. त्याच्या इतर अनेक उद्योगांमुळे नाना मॅट्रिकची परीक्षा काठावर पास झाला. त्यामुळे कॉलेज शिक्षणासाठी त्याला वऱ्हाडात अमरावतीला जावे लागले. तेथून तो इंटर परीक्षा पास होऊन औरंगाबादी आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद कॉलेजात बी.ए.साठी दाखल झाला. या कॉलेजात नाना कॉलेजच्या एक्स्ट्राकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येच अधिक रस घेत असे. एक प्रकारे विद्यार्थ्यांचे नेतृत्वच त्याच्याकडे आले होते. कॉलेजात त्याने वक्तृत्वकलेवर चांगलेच प्रभुत्व मिळवले होते. कॉलेजात असताना त्याने वक्तृत्वस्पर्धांत अनेक पारितोषिके मिळवली. याच काळात नाना लेखनही करू लागला आणि त्याची ‘सत्यकथा’ या प्रतिष्ठित वाङ्मयीन नियतकालिकात तत्काळ वर्णी लागली. त्याच्या कथा आणि कविता इतरत्रही प्रसिद्ध होऊ लागल्या. कॉलेजबाहेरही नाना इतर अनेक सार्वजनिक उद्योग करीत असे. काही वृत्तपत्रांचा बातमीदार म्हणून तो काम करत असे. त्या निमित्ताने येथल्या राजकीय, सांस्कृतिक सभासमारंभांना हजर राहणे, गावात काही विशेष घडले की तेथे बातमीसाठी धावणे हे सुरू झाले. कॉलेजकाळात सतत कुठल्या ना कुठल्या सार्वजनिक कामात स्वत:ला गुंतवून घेणे, त्या निमित्ताने लोकांत वावरणे हे तो करत राहिल्यामुळे आजही जर त्याच्या भोवती माणसे नसतील तर तो अस्वस्थ होतो. तो फार काळ एकटा राहू शकत नाही. तीच गोष्ट व्याख्यानांची; ही त्याची खास आवड आहे. तो व्याख्यानांची आमंत्रणे सहसा नाकारत नाही.
कुठलेही काम त्याने मनावर घेतले तर ते तडीला लागेपर्यंत त्याला चैन पडत नाही. हैदराबाद संस्थान विलीन झाल्यावर भारत सरकारने औरंगाबादचे आकाशवाणी केंद्र पुण्याला हलवले. आम्ही भारतात विलीन झाल्यावर आम्हाला तर काही दिलेच नाही, उलट आमचे असलेले येथून नेले, हा मराठवाड्यावर अन्याय असल्याचे नानाला जाणवले. मग नानानं गणपती उत्सवातल्या मेळ्यातून या अन्यायावर गीते लिहून लोकांत याबद्दल जागृती करण्याचं काम केलं. तो प्रत्येक साहित्य संमेलनाला हजर राहून तेथे औरंगाबाद आकाशवाणीसंबंधीचा ठराव मांडू लागला. शेवटी नाना म्हटले की, आकाशवाणी, अशी नानाची एक ओळख रूढ झाली!
नाना बी.ए. झाला आणि एकाच वेळी लॉ आणि मराठी एम. ए. करू लागला. दोन्ही ठिकाणी तो प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला. आतापर्यंतच्या त्याच्या अनेक क्षेत्रांतील चळवळींमुळे त्याचे आस्थाविषय पक्के झाले होते. त्याला मराठीचा प्राध्यापक व्हायचे होते; त्याला वृत्तपत्रव्यवसायात यायचे होतं आणि वकिलीही करायची होती! आता यातला कोणता व्यवसाय स्वीकारावा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. खरं म्हणजे मुळात त्याला राजकारणात सर्वाधिक रस होता. राजकारणात यशस्वी होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व हत्यारांवर त्याचे प्रभुत्व होते. कॉलेजात असल्यापासनू त्याने अनेक निवडणुका जिंकल्या होत्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत तो प्रत्येक वेळी प्रथम क्रमांकांची मते मिळवून निवडून आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर तो प्रथम क्रमांकाची मते मिळवून निवडून आला आहे, बीड म्युनिसिपॅलिटीच्या निवडणुकीत तो एका वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आला. तेथे तो वयाने सर्वांत लहान नगरसेवक होता. समाजवादी पक्षात त्याने रीतसर प्रवेश घेतला होता. या पक्षाच्या युवा सभेचा तो सरचिटणीस होता. परंतु आपणांस राजकारणात वावच दिला जाणार नाही हे लक्षात आल्यावर त्याला ना
लाजाने हे क्षेत्र सोडावे लागले. असे असले तरी त्याचे नेतेपण मात्र अजूनही टिकून आहे. आजही त्याने दिलेले आदेश सर्वांना पाळावे लागतात. दुसऱ्याचे आदेश पाळायची त्याला सवय नाही!
उरलेल्या तीन आस्थाविषयांत काम करण्याची इच्छा मात्र त्याला थोडी थोडी पूर्ण करता आली. एम.ए. झाल्यावर लातूरला तो मराठीचा प्राध्यापक झाला. या काळात त्याचे कविता, कथा आणि समीक्षा लेखन चालू होते. वर्षभरानंतर तो वडिलांना वकिलीत मदत करायला बीडला आला. किर्लोस्कर मासिकात प्रथम तो लिहू लागला आणि नंतर तो मुकुंदराव किर्लोस्करांच्या परिवाराचा सदस्यच झाला. किर्लोस्कर नियतकालिक समूहाच्या तिन्ही नियतकालिकांच्या संपादनात जसा तो रस घेऊ लागला, तसेच या समूहाच्या धोरणविषयक प्रश्नांतही त्याचे मत घेतले जाऊ लागले.
हळूहळू नानाच्या आस्थाविषयात आणि कार्यकक्षेत बदल झाले. त्याची वकिली इतकी वाढली की, त्याला अन्य आस्थाक्षेत्रांत लक्ष घालायला वेळच मिळेनासा झाला. आपल्या वकिली पेशात त्याने वडिलांची परंपरा पुढे चालवली. अशिलाला त्याच्या खटल्यात काही जीव आहे की नाही, या विषयी तो योग्य सल्ला द्यायचा. समाजाचे आपण देणे लागतो, हे तो कधीच विसरला नाही. वकिलीचा त्याने ‘धंदा’ केला नाही. गरीब-दीनदुबळे, शाळामास्तर, मजूर अशा वर्गांचे खटले तो पैसे न घेता चालवत असे. वकिलीतल्या त्याच्या ज्येष्ठ मित्रांनी त्याला मुंबई हायकोर्टात वकिली करायला बोलावले. नाना बीडहून मुंबईत गेला. तेथेही हायकोर्ट वकील म्हणून तो यशस्वी झाला. वकिली करत असताना तर नाना आपले सामाजिक दायित्व मानतच असे, पण उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्यानंतरही तो हे कधी विसरला नाही. गोव्यातल्या हायकोर्टात वरिष्ठ न्यायमूर्ती म्हणून काम करत असतानाची ही हकिकत आहे. ‘गोव्यात घातक स्वरूपाचा मलेरिया वाढत असून मेंदूला मलेरियाची लागण होऊन गोव्यात काही मृत्यू झाले’, अशी वृत्तपत्रात बातमी आली. ‘याबाबत गोवा सरकार काहीही करत नाही’, असेही त्यात म्हटले होते. नानाने इतर न्यायमूर्तींशी सल्लामसलत करून ही बातमीच पेटिशन म्हणून दाखल करून घेतली आणि मुख्य शासकीय सचिवांना हजर राहण्याची नोटिस पाठवली. तो हजर झाल्यावर शासनाने यासंबंधी काहीच केले नसल्याचे कोर्टाच्या लक्षात आले. नानाने आपल्या चेंबरमध्ये गोव्यातील सर्व नगरपालिकांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या साथीसंबंधी नगरपालिका काय काय करत आहेत याची चौकशी केली. कुठेही काहीही होत नाही हे लक्षात आल्यावर, शासनाने आणि नगरपालिकांनी कोणकोणत्या उपाययोजना अमलात आणाव्या, यासंबंधी सविस्तर असा लेखी आदेश हायकोर्टामार्फत त्याने दिला. काही दिवसांतच ही साथ नाहीशी झाली. शासनाने करायचे काम न्यायपालिकेने हातात घेऊ नये असा जरी संकेत असला तरी जेथे माणसांच्या जिवाला धोका होईल, अशी गंभीर परिस्थिती असते आणि शासन आपले काम बरोबर करत नसल्याचे लक्षात येते तेथे न्यायपालिका दखल देऊ शकते. जनहितार्थ नानाने हेच केले.
मुंबई उच्च न्यायालयाची शाखा औरंगाबादी निघाल्यावर तो औरंगाबादी, म्हणजे त्याच्या ‘घरी’ परतला. येथेच वाङ्मय, संगीत, राजकारण, समाजकारण अशा विषयांत ॲकॅडेमिक रस घेणाऱ्या त्याच्या समानधर्मीय मित्रांचा परिवार होता. मुख्यत: अनंत भालेराव होते. आता नानाची वकिली अशी चालत होती की, रात्री बारा-एकपर्यंत अशील हटतच नव्हते. वकिलीबराबेरच त्याला वाङ्मयादी क्षेत्रातही काम करायचे होते, पण वकिलीतून उसंत मिळत नव्हती. मग नानाने एक निर्णायक पाऊल उचलले. चालून आलेले हायकोर्टाचे न्यायमूर्तिपद स्वीकारण्याचा निर्णय त्याने घेतला.
आता नानाला फुरसतीचा अधिक वेळ मिळू लागला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास सांगणारा मराठीत एकही ग्रंथ नव्हता. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांना तसे म्हणावे, तर ‘आम्ही असे केलेच काय म्हणून त्याचे ढोल पिटवावे!’ असे उत्तर मिळत असे. शेवटी अनंत भालेरावांना पटवण्यात आम्हां मंडळींना यश आले. त्यात अर्थातच नानाही होता. अनंत भालेरावांचे पुस्तक तयार झाले. पण हे पुरेसे नव्हते. त्यात अनंतरावही अचानक गेले. आता या मुक्तिसंग्रामावर अधिकृतपणे लिहिणारा कोण? नानाने जरी या आंदोलनात भाग घेतला नव्हता तरी पुरुषोत्तमराव चपळगावकरांमुळे त्याला पुष्कळच माहिती होती. ही सर्व नेतेमंडळी त्यांच्या घरी वारंवार येत; तेथे चर्चा होत. यातून नानाही राजकारणात तयार झाला होता. प्रत्यक्ष लढ्यात सहभागी लोक जर लिहीत नसतील तर आपणच अभ्यास करून हे काम केले पाहिजे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला होता. त्यांचे जर साधार चरित्र लिहिले तर या संग्रामातील अनेक अज्ञात घटना, समरप्रसंग ज्ञात होतील, आणि या संग्रामाचा इतिहास पूर्णतेच्या अधिक निकट जाईल. नानाने रामानंद तीर्थांचे साधार चरित्र लिहिले, अनंतरावांच्या पुस्तकाबरोबरच नानाचे ‘कर्मयोगी संन्यासी’ हेही पुस्तक अधिकृत समजले जाते. त्यानंतर नानाने हैदराबाद लढ्यातील व्यक्तींच्या आणि हैदराबादमधील निझामाच्या पदरी असणाऱ्या अनेक नवाबांच्या, अधिकाऱ्यांच्या व्यक्तिरेखा लिहिल्या. स्वत:च्या वडिलांकडून आत्मकथा लिहून घेतली. आपल्या जीवनातील आठवणी लिहून त्यांच्याद्वारे मराठवाड्यातील लोकजीवनाचे आणि संस्कृतीचे अनेक पदर उलगडले. मराठवाड्याच्या बाहेरील महाराष्ट्राला हे सर्व अज्ञात होते. या पुस्तकांमुळे मराठवाडा समजून घेण्याची एक सोय झाली.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी अतिशय मौलिक कार्य केले अशांचे समाजाला विस्मरण होत असल्याचे नानाला जाणवत होतेच. अशांच्या कार्याचा परिचय करून देऊन त्याचे मोल समाजापुढे ठेवले पाहिजे, या जाणिवेतून नानाने भारतीय पातळीवरील विस्मृत झालेल्या ज्या पुढाऱ्यांच्या कार्याबद्दल आणि ज्या पुढाऱ्यांमधील संबंधाबद्दल गैरसमज प्रसृत झाले होते ते सप्रमाण दूर करण्यासाठी लेखन केले. नेहरू, पटेल, राजाजी, राजेंद्रप्रसाद, सुभाषचंद्र बोस असे भारतीय पुढारी आणि शंकरराव देव, केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी असे महाराष्ट्रातले पुढारी यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या व्यक्तिरेखा लिहिल्या. आपल्या लेखनातून, व्याख्यानांतून लोकशिक्षण देऊन नवा समाज घडवणारे आचार्य स.ज. भागवत, आचार्य जावडेकर, विठ्ठल रामजी शिंदे असे अनेक विचारवंत होऊन गेले. त्यांनाही आजचा महाराष्ट्र विसरला आहे. त्यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करणारे पुस्तक आता येऊ घातले आहे. आजकाल पंडित नेहरूंवर अनैतिहासिक टीका होत आहे. त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावर जाहीरपणे शिंतोडे उडवणे सुरू आहे. आधुनिक भारताचा पाया घालणाऱ्या या राष्ट्रपुरुषाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कार्याचे स्वरूप आणि मोल निश्चित करणारा नानाचा ग्रंथही लवकरच प्रकाशित होत आहे.
कुठल्याही क्षेत्रात काम करत असो, नानाने आपली सामाजिक दायित्वाची भावना जागृत ठेवली. म्हणूनच लेखन करत असताना आपण सामान्य वाचकासाठी लिहितो आहोत याचे भान नानाने ठेवले. या भानातूनच नानाची भाषाशैली आणि लेखाची मांडणी सिद्ध झाली आहे. हे लेखन वैचारिक असूनही ते उत्कटपणे वाचनीय असते. वाचक ते वाचायला लागला, की वाचन पूर्ण करूनच तो ते खाली ठेवतो. नाना अतिशय सोपे, पण अर्थसमृद्ध मराठी लिहितो. संशोधनपर लेखनाची शिस्त तो काटेकोरपणे पाळतो. हे लेखन सत्यविन्मुख कधीही होत नाही. तरीही ते ललित लेखनाइतके वाचनीय असते.
ज्या ल़ेखनाचे केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर सांस्कृतिक मोलही फार मोठे आहे असे लेखन महाराष्ट्राला सादर करणारे न्या. नरेन्द्र चपळगावकर महाराष्ट्रात लोकशिक्षण करणाऱ्या विचारवंतांच्या मालिकेतले आजचे प्रमुख विचारवंत आहेत.

डॉ. सदानंद बोरसे (अपेक्षा ध्रुवताऱ्याच्या दिशेची)

न्यायमूर्ती (निवृत्त) नरेन्द्र चपळगावकर यांची वर्धा येथे भरणाऱ्या शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व साहित्यप्रेमींसाठी एक आनंददायी घटना.
‘संमेलनाध्यक्ष कोण होणार?’ या प्रश्नापासून सुरू होणारी मोहीम निरनिराळी वळणे घेत एका नावावर स्थिरावते. या मुदतीत (आणि काही वेळा संमेलनाध्यक्षांची निवड झाल्यानंतरसुद्धा काही काळ) वेगवेगळ्या वाद, गरमागरम चर्चा, सूत्रांकडून मिळणारी आतील बातमी याचे बरेचदा पेवच फुटते. नरेन्द्र चपळगावकरांच्या निवडीमुळे या वर्षी अशा गरमागरम सनसनाटी बातम्यांना वाव मिळाला नाही. आपल्या मतांवर ठाम राहूनही सर्व विचारांच्या व्यक्तींशी व्यक्तिगत सौहार्द आणि मैत्री जपण्याच्या नरेन्द्र चपळगावकरांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड साऱ्यांनीच उत्साहाने स्वागतशीलपणे स्वीकारली.

नरेन्द्र चपळगावकरांना जवळचे स्नेही, सुहृद ‘नानासाहेब’ अथवा ‘नाना’ या नावाने उल्लेखतात.
नानासाहेबांचे वडील पुरुषोत्तमराव चपळगावकर हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, विचाराने पक्के गांधीवादी. आपल्या बालपणीच्या आठवणी

लिहिताना नानासाहेबांनी आपल्या वडिलांचा ज्या जिव्हाळ्याने, आदराने उल्लेख केला आहे; त्यावरून त्यांच्यावर वडिलांचा किती खोल प्रभाव होता, ते लक्षात येते. वडिलांची देशभक्ती, त्याग, त्यांना असलेला गांधी–विनोबांबद्दलचा आदर या साऱ्याचा अमिट ठसा नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटलेला आहे. नानासाहेबांच्या केवळ लेखन – भाषणांतूनच नव्हे, तर आयुष्यभर त्यांनी पेललेल्या विविध जबाबदाऱ्यांमधून ही बाब वारंवार नजरेस पडते. सहाजिकच हे साहित्यसंमेलन वर्धा येथे भरणे ही नानासाहेबांसाठीसुद्धा विशेष औचित्याची बाब ठरणार आहे.
‘नरेन्द्र चपळगावकर’ हे नाव वैचारिक लेखनासाठी अत्यंत सुपरिचित आणि सुप्रसिद्ध असले, तरी त्यांची वाङ्मयीन कारकिर्द सुरू झालेली होती ललित लेखनाने. त्यांच्या कथा, कविता ‘सत्यकथा’, ‘किर्लोस्कर’ अशा दर्जेदार नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ या नियतकालिकांच्या धोरणविषयक निर्णयांमध्येही त्यांचे मत विचारात घेतले जात होते.
मात्र बहुआयामी प्रज्ञा लाभलेल्या नरेन्द्र चपळगावकरांचा पैसा केवळ साहित्यापुरता मर्यादित राहिला नाही. घरातून झालेले संस्कार, महाविद्यालयीन काळापासूनच दिसून आलेले त्यांचे नेतृत्वगुण, शिक्षण घेताना लाभलेले प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे प्राध्यापक, समानशील असे जिवाभावाचे मित्र या साऱ्यांची परिणती म्हणजे आजही नरेन्द्र चपळगावकर साहित्यकारणाबरोबरच समाजकारण अन् राजकारणातही रस घेतात.
नानासाहेबांनी महाविद्यालयीन जीवनातील निवडणुका, मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीच्या निवडणुका तर जिंकल्याच होत्या; बीड नगरपालिकेत ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते आणि त्या वेळी ते वयाने सर्वात लहान नगरसेवक ठरले होते. मात्र आपल्या प्रत्येक निवडीच्या वेळी सामाजिक बांधिलकीचे भान राखत, लोकशाही प्रक्रियेचा मान राखत संस्थात्मक आणि रचनात्मक कार्य करण्यासाठी मिळालेली संधी आणि जबाबदारी याच दृष्टिकोनातून त्यांनी काम केले.
समाजस्वास्थाबद्दलच्या आस्थेमुळेच नानासाहेबांची लेखणीही ललित लेखनाकडून वैचारिक लेखनाकडे वळली. आधुनिक महाराष्ट्राच्या विचारांची पायाभरणी करणारा एकोणिसाव्या शतकाचा प्रबोधनकाल असो, हैदराबादचा मुक्तिसंग्राम असो, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लोकमान्य टिळक आणि म. गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढा असो अथवा उत्तरार्धातील पं. नेहरूंच्या पंतप्रधानकीची कारकिर्द असो – या सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचा वेधक ऊहापोह त्यांच्या ‘त्यांना समजून घेताना’, ‘लो. टिळक आणि म. गांधी’, ‘पंतप्रधान नेहरू’, ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’, ‘कर्मयोगी संन्यासी’, ‘राज्यघटनेचे अर्धशतक’ अशा अनेक ग्रंथांमधून येतो. त्यांचा प्रचंड व्यासंग, त्यांचे सखोल चिंतन, अनेक पैलू एकाच वेळी लक्षात घेऊन त्यांचे व्यामिश्र परस्परसंबंध उलगडून दाखवण्याची त्यांची हातोटी यांमुळे त्यांचे लेखन आशयसमृद्ध तर असतेच; शिवाय मुळात लालित्यपूर्ण लिखाणाची आवड असल्याने त्यांच्या वैचारिक लेखनालाही रसाळपणाची जोड मिळाली आहे. (या ‘रसाळपणा’त त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र असलेल्या सुधीर रसाळांच्या सहवासाचाही मोठा वाटा आहे.)
नानासाहेबांच्या घराचे एक प्रथमदर्शनीच डोळ्यांत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे या घराच्या भिंती पुस्तकांच्या बनलेल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहाकडे नुसते पाहूनसुद्धा छाती दडपून जाते. ग्रंथांमधून उठणारी विचारांची आवर्ते, त्यांच्या पानांमधून वाहणारे संवेदनशीलतेचे वारे यांनी या घराच्या दगड-विटांच्या भिंती आभासी बनवल्या आहेत. आणि नंदिनीताईंपासून सायली – भक्ती – मेघना अन् श्रीधर या साऱ्या कुटुंबीयांच्या अकृत्रिम स्निग्ध स्नेहाने अन् उबदार जिव्हाळ्याने अनेकांसाठी औरंगाबादच्या जयनगरातील ही वास्तू म्हणजे हक्काचे ‘आश्रय घरटे’ बनली आहे.
नानासाहेबांनी वयाची आठ दशके पार केली आहेत, ही बाब त्यांच्या उत्साहातून आणि कार्यशीलतेतून कधीच लक्षात येत नाही. नव्याचे मनमोकळे स्वागत करणाऱ्या त्यांच्या उमदेपणामुळे त्यांच्याबरोबर बोलताना कुणालाच ज्येष्ठतेचा जाच अन् वाढत्या वयाचा काच किंचितही जाणवत नाही. वयातील अंतर सहजगत्या पुसून टाकून समोरच्या व्यक्तीला आपलेसे करण्याचा त्यांचा हातखंडा अगदी पहिल्या भेटीपासून प्रत्ययाला येतो.
खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचा उद्‌घोष, त्यातून जन्माला आलेले चंगळवादी अर्थकारण अन् वाढती विषमता, सामान्य माणसाच्या सहजी आवाक्यात आलेले तंत्रज्ञान, त्यामुळे आपले मत मांडण्यासाठी उपलब्ध झालेली सुलभ व्यासपीठे, पण त्यातूनच निर्माण होणारा सामाजिक दुभंग, व्यक्तिगत मनोव्यापारापासून दहशतवादासारख्या जागतिक समस्येपर्यंत अनेक गोष्टी आज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सगळ्यांच्या आयुष्यात शिरलेल्या आहेत. यातल्या अनेक गोष्टींची दखल साहित्यातूनही घेतली जात आहे. दर वर्षी भरणाऱ्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’बाबत अधिकउणी चर्चा (त्यात ‘अधिक’ थोडी अन् ‘उणी’ जास्त) दर वर्षीच होत असते. मात्र साहित्याचे मोठेपण, गरज सारे जण मान्य करतात. ‘नेमेचि येतो’, ‘दर वर्षी भरणारा उत्सवी सोहळा’ अशी टीका होऊनही या संमेलनाला सर्व माध्यमांमध्ये मिळणारी जागा पाहता हा मराठी मुलखातला, मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा महोत्सव आहे, हे मान्य करावेच लागते. म्हणूनच या संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जणूकाही साहित्यनौकेचे कप्तानपदच आहे! पुढील वर्षभर हे कप्तानपद सांभाळणारे न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर व्यासंगी विचारवंत, संवेदनाशील साहित्यिक, गुणग्राही रसिक अन् विवेकशील उदारमतवादी आहेतच. शिवाय या साहित्यलक्षी पैलूंप्रमाणेच ‘नि:स्पृह न्यायाधीश’ हा व्यवसायापेक्षा समाजकारणाशी अन् राजकारणाशी निगडित असलेला पैलूही ते स्वतःमध्ये वागवतात. त्यांच्या हाती या नौकेचे सुकाणू असणार आहे. साहजिकच त्यांच्या अध्यक्षीय भाषणाबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
‘साहित्य म्हणजे वास्तवाचे प्रतिबिंब’, ‘अनेकांच्या आयुष्यशिल्पाला आकार देणारे प्रभावी साधन म्हणजे साहित्य’ अशा उक्ती उचित मानल्या आणि आजचा सभोवताल लक्षात घेतला; तर त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचे होकायंत्र जी न्याय्य दिशा दाखवेल, ती केवळ साहित्यासाठीच नव्हे, तर तमाम मराठी मुलखासाठी अन् मराठी माणसांसाठी भावी काळातील वाटचाल ठरणारी ध्रुवताऱ्याची दिशा ठरावी.

राधाकृष्ण मुळी (संयमी तरीही स्पष्ट. . . . ! – राधाकृष्ण मुळी)

शिक्षक आणि प्राध्यापक, वकील आणि न्यायाधीश, कार्यकर्ते आणि पदाधिकारी, पत्रकार आणि संपादक,  वक्ते आणि लेखक अशा भूमिकेत वावरत आलेले नरेन्द्र चपळगावकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. संमेलन विदर्भात, वर्ध्यात  होत आहे, तेव्हा दोन-तीन  योगायोगांचा उल्लेख सुरुवातीलाच करायला हवा. चपळगावकर महाविद्यालयीन शिक्षणासाठी वर्षभर का होईना अमरावतीत होते. त्यांचे विदर्भाशी नाते जुने म्हणजे जवळपास सत्तर वर्षांपासूनचे  आहे. अमरावतीतील दिवसांबद्दल त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेही आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, त्यास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थानातील चळवळीचे सर्वमान्य नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे अधिकृत म्हणता येईल असे विस्तृत चरित्र चपळगावकर यांनी लिहिले आहे. चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली आहेत. मुक्तिलढ्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला, तेव्हा त्यांनी  ‘सकाळ’ दैनिकाच्या रविवार पुरवणीत वर्षभराची लेखमाला लिहिली. मराठीतील एक श्रेष्ठ संपादक अनंतराव भालेराव यांचा अपवाद वगळता संस्थानातील चळवळीवर अन्य कोणीही इतके लिखाण केलेले दिसत नाही. निजामशाहीच्या जोखडातून संस्थान मुक्त झाल्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात संस्थानातील लोकचळवळीतील नेत्यांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल लिहिणाऱ्यास संमेलनाचे अध्यक्षपद लाभावे हा चांगला योग आहे. महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जिल्ह्यात संमेलन होत आहे. गांधीजींवर निदान दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, ही बाबही उल्लेखनीय आहे.

एके काळी अन्नभेसळ कायदा हा आपल्याकडे फार चर्चेचा विषय होता. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या कायद्यावर चपळगावकर यांनी मराठीत पुस्तक लिहिले. ते त्यांचे पहिले पुस्तक. अर्थात तत्पूर्वी त्यांनी विविध दैनिकांत लिखाण केले. अगदी ‘सत्यकथे’त एक कथाही (संपादकीय सुचनेनुसार अगदीच किरकोळ बदल करून!) प्रसिद्ध झाली होतीच. पाव शतकाहून अधिक कालावधी वकिलीचा व्यवसाय आणि सुमारे दशकभर उच्च न्यायालयात न्यायाधीश असा सर्वार्थाने व्यस्त कालखंड व्यतीत करताना आणि नंतर निवृत्तीनंतरची आजवरची सुमारे चोवीस वर्षे सार्वजनिक जीवनात सक्रिय राहात त्यांनी तीस पुस्तके लिहिली, ही बाब मुद्दाम लक्षात घ्यायला हवी. अलीकडे प्रसिद्ध झालेले ‘पंतप्रधान नेहरू’ हे त्यांचे पुस्तक त्यांचा व्यासंग आणि शैली यांचे उत्तम उदाहरण होय. आजच्या काळात तर हे पुस्तक विशेष महत्त्वाचे ठरते.

त्यांच्या एकूण पुस्तकांवर दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येते की, ‘अन्नभेसळ कायदा’ आणि नंतरचे ‘निवडणूक कायदा’ ही दोनच पुस्तके केवळ विशिष्ट कायद्याची  पुस्तके आहेत. ‘मनातली माणसं,’ ‘संस्थानी माणसं’ आणि ‘हरवलेले स्नेहबंध’ यांसारखी पुस्तके फार समर्थ व्यक्तिचित्रे रेखाटणारी आहेत. आणखी एखादा संग्रह तर सहजच निघू शकेल इतकी चांगली व्यक्तिचित्रे विविध मासिके, दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहेत. टिळक आणि गांधी युगाची सांधेजोड सांगणारे, आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजजी या महान नेत्यांच्या भूमिका समजावून सांगणारे,  आणि नेहरूंच्या पंतप्रधान पदाची कारकिर्द मांडणारे ही आणि अशी पुस्तके आधुनिक इतिहासावरील आहेत. ही पुस्तके लिहिताना चपळगावकरांनी न्यायाधीशाची भूमिका घेतलेली नाही. उलट हल्ली निवडक बाबतींत जे कोण पूर्वग्रहदृष्टीने न्यायाधीशांची भूमिका घेत सोयीचा न्यायनिवाडा लादण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासमोर तो काळ आणि त्या काळातील त्या मान्यवरांच्या भूमिका सप्रमाण मांडणारी आहेत. अर्थात, कुणाला ठरवून  उत्तर देण्याचीही चपळगावकर यांची भूमिका नाही, अभिनिवेश किंवा आवेश नाही. (तसा तो नसल्यामुळे काहींना निष्कारण प्रश्न उभे करण्याचा अवसर मिळालाही असेल… !) व्यक्तिचित्र असो, की इतिहासातील एखादा कालखंड… त्या वेळेची परिस्थिती नेमकेपणाने मांडणे आणि त्या वेळेच्या परिस्थितीच्या चौकटीत, काळाच्या पटावर माणसे उभी करणे ही त्यांची पद्धत आहे. त्यामुळेच त्यांनी लिहिलेले स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र हे केवळ स्वामीजींचे चरित्र नसून संस्थानातील चळवळीचा इतिहास आहे असा अभिप्राय डॉ. य.दि. फडके आणि डॉ. सुधीर रसाळ यांच्यासारख्या फार जाणकार अभ्यासक आणि समीक्षकांनी दिलेला आहे. अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रसिद्ध झालेले त्यांचे चरित्र असेच काळ आणि कर्तृत्व उभे करणारे आहे.

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी चपळगावकरांच्या एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच ‘जिज्ञासा  हे चपळगावकर यांच्या विचारांचे अधिष्ठान’  असल्याचे म्हटले आहे. या अधिष्ठानामुळेच ते  बौद्धिकदृष्ट्या आजही अत्यंत कार्यक्षम आणि उत्साही आहेत. सुसंगत भूमिका, संयत अभिव्यक्ती आणि सुबोध प्रतिपादन ही तर त्यांच्या लिखाणाची सहज लक्षात येणारी वैशिष्ट्ये आहेत. वकिली आणि त्यातही हायकोर्टातील वकिली आणि पुढे तेथील न्यायाधीशपद  या व्यावसायिक संसाराची भाषा इंग्रजी, पण या भाषेचा कोणताही विपरीत परिणाम त्यांच्या शैलीवर झालेला आढळणार नाही. भाषेबद्दल दुसराही मुद्दा मुद्दामच लक्षात घ्यावा असा आहे. चपळगावकर व्यासपीठावर वावरत आलेले आहेत. अगदी आजही त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे येतच असतात. पण  व्यासपीठावर गेल्यावर लोकप्रियतेपायी त्यांनी बौद्धिक शिस्त सोडलेली दिसणार नाही. निश्चित भूमिकेचा संयत, पण स्पष्ट आविष्कार हे त्यांचे वैशिष्ट्य व्यासपीठावरूनही कायमच दिसत आलेले आहे. आपल्याकडे लेखक आणि वक्ता या दोन्हीही भूमिकेत  वावरणारे लोक आहेत. त्यांपैकी काहींची लिखाणाची शैली वक्तृत्वपूर्ण झालेली दिसेल. पण वक्तृत्वात टाळ्यांचा मोह होऊ न देणारे आणि  लेखनावर वक्तृत्वाचा विपरीत परिणाम होऊ न  देणारे किती आहेत? जे असतील त्यात चपळगावकर यांचा क्रम वरचा आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि लिखाणात हे गुण आले कुठून? ते आज औरंगाबादला वास्तव्य करत असले, तरी त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध बीडसारख्या ठिकाणी गेला आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तमराव चपळगावकर हे स्वातंत्र्यसैनिक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी. आपला व्यवसाय फार नेकीने करणारे निष्ठावंत गांधीवादी अशीच पुरुषोत्तमरावांची मराठवाड्यात सार्वत्रिक ओळख. त्यांच्यामुळे नरेन्द्र चपळगावकर यांना अनेक थोरामोठ्यांचा सहवास लाभला. घरातील बैठकीत त्यांचा लहानपणापासून वावर. त्यांना वडिलांनी प्रतिबंध केला नाही. त्या बैठकीत जी माणसे त्यांनी पाहिली त्यातील अनेकांशी त्यांचा दीर्घकाळ संपर्क राहिला. काहींचा सहवासही लाभला. ही सगळी मंडळी राजकीय निष्ठा आणि भूमिका यांबद्दल फार स्पष्टता पाळणारी होती. त्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संस्कार चपळगावकर यांच्यावर झाले. मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनात वावरत आलेल्या तीन पिढ्यांशी त्यांचा संपर्क आला. डॉ. म.भि. चिटणीस, प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे मार्गदर्शक त्यांना लाभले. अनंतराव भालेराव, श्री.पु. भागवत, मुकुंदराव किर्लोस्कर या मान्यवर संपादकांच्या निकटच्या वर्तुळात ते होते. या वर्तुळातील वैचारिक देवघेव, अनुभव आणि दृष्टी यांची संपन्नता वेगळी सांगायला नको. राज्यातील निवडक सार्वजनिक संस्थांतील त्यांचा कळकळीचा सहभाग त्यांच्या अनुभवाची श्रीमंती वाढवणारा ठरला नसताच तर नवल. या अनेक स्तरांवरील वावरण्यातून त्यांची दृष्टी घडत आलेली आहे. समाजवादी चळवळीच्या ऋणाचा  त्यांनी उल्लेख केलेला आहेच. यातून आकाराला आलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उत्तम व्यासंगाची आणि सतत बौद्धिक परिश्रम घेण्याच्या वृत्तीची जोड मिळाली. त्यामुळेच ते मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे लिखाण सातत्याने करू शकले. आजही एक–दोन पुस्तकांचा आराखडा त्यांच्यपाशी आहे.

स्वतःचा उत्तम ग्रंथसंग्रह असलेल्या निवडक अभ्यासकांपैकी ते एक आहेत. व्यवसाय आणि अभिरुची यांमुळे त्यांच्याकडे कायद्याची आणि ललित साहित्याची पुस्तके असणे स्वाभाविक आहे. पण ही पुस्तके मुक्तहस्ताने व्यक्ती आणि संस्थांना दिल्यानंतरही त्यांच्याकडे आज असलेला वाढता ग्रंथसंग्रह कोणासही हेवा वाटावा असा आहे. या संग्रहाला ‘वाचस्पती’ नी दाद दिली आहे.

त्यांची जिज्ञासा, त्यांचे आजवरचे लिखाण आणि ते अजूनही लिहू शकतील अशा विषयांचा विचार मनात आल्यावर सहजच वाटते की, सार्वजनिक जीवनातील व्यस्तता, संस्थात्मक कारभारातील व्यग्रता आणि  कुठूनही आणि कधीही हक्काने घरी येणाऱ्या उदंड मित्रपरिवारास प्रतिसाद देणे थोडे  कमी झाले असते, तर त्यांच्या हातून आणखी पाच-दहा महत्त्वपूर्ण विषयांवरील उत्तम पुस्तके लिहून झाली असती.

पण मग ते कदाचित एन. पी. चपळगावकर म्हणून ओळखले गेले असते…

त्यांना हक्काने आणि जिव्हाळ्याने  ‘नाना’ कोण म्हणाले असते?

ॲड. सुधीर बारलिंगे (आपुलकीने वागणारा थोर माणूस)

जुन्या आठवणींनी आमचे मन भरून गेले.
मी त्यांच्याकडे वकिली शिकण्यासाठी म्हणून १९८६ साली गेलो. त्यांनी मला मुलाप्रमाणे प्रेम दिले. त्यांच्याकडे मला आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी मिळाली. वकील, न्यायाधीश आणि साहित्यिक म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे.
ते वकिली करत होते, तेव्हा त्यांच्या कार्यालयात अनेक ज्युनिअर्स होते. त्यांना खऱ्या अर्थाने मदत करणारे म्हणजे सर्वश्री विवेक भावठाणकर, हरीभाऊ मुंडे आणि सुरेश कुलकर्णी. आम्ही सारेच घरच्यासारखे वावरत असू. आज कदाचित विश्वास बसणार नाही, पण कुठलीही फाइल वाचायला आणि चालवायला घेतली, तरी साहेबांचा त्याला नकार नसे. ते आम्हाला सर्वार्थाने प्रोत्साहन देत. कार्यालयातील सर्वांच्याच सुख-दुःखात लक्ष घालत. त्यांच्या वागण्यात तेव्हा अनुभवलेला जिव्हाळा पुढेही कायमच अनुभवत आलो आहोत.
त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दल सर्वांनाच आदर होता आणि आहे. वकील म्हणून कोर्टासमोर युक्तिवाद करताना त्यांनी कधी मुद्दा सोडला नाही. ते सरळ मुद्द्यावर युक्तिवाद करत. कायद्यातील क्लिष्ट प्रश्नांबाबत त्यांचे असे मत होते की, ‘For every malady under the sun, there is a remedy or there is none. If there is one, go and find it or if there is none, never mind it.’

त्यांच्या आस्थेबद्दल एक उदाहरण सहज आठवते. एकदा मी नरहर कुरुंदकर यांच्या लिखाणातील काही मुद्द्यांबाबत शंका विचारली, तर त्यांनी मला दोन पुस्तके भेट दिली आणि सांगितले की, ही पुस्तके वाच म्हणजे तुला कुरुंदकरांबाबत मराठवाड्यातील जनतेच्या भावनेची कल्पना येईल.
कायम आपुलकी आणि आत्मीयतेने वागणाऱ्या व खूप काही सहजपणे शिकवणाऱ्या साहेबांचा मला स्नेह लाभला हे माझे भाग्य होय.

कौटुंबिक लेख

नंदिनी चपळगावकर (आठवले तसे)

मला माझ्या आयुष्यातील कितीतरी गोष्टी आठवतात, अगदी वयाच्या पाचव्या वर्षांपासून! मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील परळी- अंबाजोगाईसारख्या तेव्हाच्या गावात माझे बालपण आणि लग्नापूर्वीचे आयुष्य गेले. मी पांडे या अंबाजोगाईच्या वतनदार घरातील. मला तेव्हाचे ते वाडे, वाड्यातील अनेक एकत्र कुटुंबे, त्यांचे संसार, जीवाभावाची माणसे, परिस्थितीचे हेलकावे, या हेलकाव्यांचे जगण्यावर आणि परस्पर संबंधांवर होणारे परिणाम, कुटुंबातील रागलोभ असा कितीतरी तपशील आठवतो. आम्ही चार भावंडे; दोन भाऊ, दोन बहिणी. माझ्या माहेरच्या आयुष्यात अनेक आर्थिक चढउतार मी पाहिले आणि अनुभवले. परळीतील ज्या बाजारावर एके काळी माझ्या वडिलांनी राज्य केले तिथेच त्यांना प्रापंचिक जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीही करावी लागली. खरं म्हणजे माझे वडील अत्यंत हुशार. त्या जुन्या काळात त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत फार उत्तम यश मिळवले होते. त्यांना त्यांच्या आजोबांनी (माधराव मुदगल) म्हणजे आईच्या वडलांनी पुढे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला होता. पण माझे आजोबा – आत्मारामपंत पांडे – वडिलांचे वडील. हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि स्वातंत्र्यलढ्यातील कारावासाचा त्यांच्या वकिली व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत तेव्हाच्या प्रथेप्रमाणे थोरला मुलगा म्हणून माझ्या वडिलांना प्रापंचिक जबाबदारी सांभाळावी लागली. घरात त्यांच्यासह सहा भाऊ आणि पाच बहिणी असा व्याप होता. तेव्हा त्यांना शिक्षण हा पर्याय परवडणारा नव्हता. त्यांनी परळीत अडत काढली आणि निदान वीसएक वर्षे ती उत्तम चालली. पुढे परिस्थिती बदलली.
माझे शिक्षण परळी येथील वैद्यनाथ विद्यालयात झाले व तिथेच मी मॅट्रिक झाले. पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे माझ्या लग्नाचीच वडिलांना काळजी वाटत होती. त्या काळी मुलीचे लग्न म्हणजे हुंडा, देणेघेणे, मानपान हे सर्व करावे लागत असे. त्यासाठी एवढा पैसा नव्हता.
माझ्या वडिलांना असे वाटत असे की, जवळच्या गावात जर माझे सासर असेल तर त्यांना माझी सहज भेट घेता येईल. शिवाय त्यांच्या दृष्टीने मुलीचे सासर हे एक सुसंस्कृत कुटुंब असणे फारच महत्त्वाचे होते.

बीडला चपळगावकर कुटुंब होते. चपळगावकरांचा वाडा गावात होता व पुरुषोत्तमराव चपळगावकर यांचा बंगला गावाबाहेर होता. त्यांना गावात काका म्हणूनच ओळखत. त्यांचा मुलगा लग्नाचा आहे, असे वडिलांचे मित्र मधुसूदनराव वैद्य यांनी सांगितले.
रीतसर नरेन्द्र मला बघण्यासाठी अंबाजोगाईला आले तेव्हा ते एम.ए., एल्एल.बी. होते व बीडला वकिली करत होते. मी नुकतीच मॅट्रिकची परीक्षा पास झालेली होते. माझे मामेभाऊ आर.डी. देशपांडे यांच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. सोनवळकर नावाचे काकांचे नातेवाईकही अंबाजोगाईलाच होते. माझ्या आई-वडिलांनी रितीप्रमाणे हे लोकं कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, याची माहिती घेतली. घरच्या सगळ्या लोकांना दाखवण्यासाठी माझे वडील पुन्हा मला बीडला घेऊन गेले.
चपळगावकरांकडून पसंती आली. आता प्रश्र्न असा होता की, लग्न कसे करता येईल. माझी मावशी गावात राहत होती. तिचे यजमान म्हणाले की, ‘हे कुटुंब सुसंस्कारित आहेच, आर्थिक बाजूही चांगली आहे. अशा स्थळासाठी तुम्ही तुमचा काहीच विचार न करता त्यांच्याकडे कसे गेलात?’ पण वडिलांनी विचार केला की, आता येथपर्यंत आलो आहोत तर काकांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची भेट घेऊन पुढे जावे. त्या काळी लग्नाची बैठक होत असे. त्यात दोन्ही बाजूंचे मध्यस्थ असत व मग लग्नात देणीघेणी कशी करावी हे ठरवत असे. बैठक काकांच्या घरीच बीडला झाली. यात माझ्या वडिलांसोबत मधुसूदनराव वैद्य, आर.डी. देशपांडे आदी, तर काकांसोबत रामचंद्रराव देशपांडे, बाबा , माझे चुलतसासरे हे होते. बैठक सुरू झाल्यावर काकांच्या वतीने बोलणा-यांनी देणीघेणी कशी असावीत, हे सुरू केले. माझे वडील घाबरून गेले. आता काय करता येईल, असा विचारही त्यांना आला. मग काकांनी त्यांना आतल्या खोलीत बोलावले व म्हणाले, ‘‘तुम्हाला काय जमेल ते तुम्ही करा, आम्ही अजिबात काहीही तक्रार करणार नाही. लग्न आमच्या घरासमोर होईल. तुमची सोयसुद्धा आम्हीच करू. मुलीचे कपडे, दागिने जे काही असेल तेही आम्हीच करू. तुम्ही अजिबात काळजी करू नका.”
मग दोन – तीन दिवसांत माझ्या मावशीकडे साखरपुडा ठरला. त्या दिवशी काका, बाबा, विजू आत्या, माझी नणंद हे सर्व रितीप्रमाणे साडी, अंगठी, साखरेचा पुडा, ओटीचे सामान हे सर्व घेऊन आले. साखरपुडा झाल्यावर लक्षात आले की, नवऱ्या मुलाला तर आपण बोलावले नाही, की त्याचा सत्कारही केला नाही. चपळगावकर तेव्हा डॉ. जोशींच्या दवाखान्यात बसले होते. त्यांना बोलावले व अक्षरशः एक नारळ, एक रुपया, साखरेचा पुडा एवढेच दिले. अजूनही मला ते म्हणतात, ‘‘अक्षरशः तुम्ही मला नारळ आणि एक रुपया देऊन वाटी लावले!”
लग्न ३ जूनला (१९६८) करण्याचे ठरले. लग्न पंधरा दिवसांवर आल्यावर नातेव
कांपैकी कोणीतरी अशी अफवा उठवली की, मुलीला मांडीवर कोड आहे. लग्न आठ दहा दिवसांवर आलेले. काका अतिशय अस्वस्थ झाले. त्यांना ही गोष्ट कोणासमोर बोलताही येईना. मग काकांनी मुलाला – नरेन्द्रला सांगितले की, काय करायचे आहे हे पाहा. पण लग्न होऊन ती मुलगी आपल्या घरी आली, तर तिच्याबरोबर तुला संसार करावा लागेल. मग शेवटी गोविंद जोशी हे डॉक्टरच असल्यामुळे त्यांना ही शंका सांगितली गेली. त्यांनी उपाय शोधला की, आपल्याकडील एखाद्या महिला डॉक्टरला मुलीची तपासणी करू द्यावी. काकांना हे काही पटले नाही. त्यांना संकोच वाटू लागला. शेवटी डॉ. जोशींनी सांगितले की, असे काही असते तर त्यांनी नानासाठी ही मुलगी सुचवली नसती. त्या कुटुंबाची सर्व माहिती घेऊनच आपण पुढे गेलेलो आहोत. काकांचा मोठेपणा एवढा की, त्यांनी मला किंवा माझ्या कुटुंबीयांना लज्जास्पद वाटेल अशी कोणतीही तपासणी करण्याचा विचारही केला नाही.
दोन्हीही घरी लग्नाची तयारी सुरू झाली. माझ्या आई-वडिलांकडे जास्त खर्च नव्हता. कारण वऱ्हाड बीडला जाणार होते. माझ्यासाठी दोन साड्या, इतर कपडे, गंध-पावडर, कंगवा-आरसा व ते ठेवण्यासाठी पेटी हे दिले होते. आई-वडिलांनी दिलेली ती पेटी अजूनही माझ्याजवळ आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही, माझी मावशी, मामेभाऊ, मामा-मामी इतर नातेवाइकांसह सर्व जण एसटीने बीडला गेलो. वऱ्हाडाला उतरायला तेव्हाच्या प्रथेप्रमाणे एका घरात जागा दिलेली होती. ते घर तुंगारअण्णांचे. चपळगावकरांच्या घरासमोर मोठे अंगण होते. तिथेच मंडप, व सजावट केलेली होती. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे सीमंत पूजनही झाले. लग्नासाठी अनंतराव भालेराव, म.द. पाध्ये, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ पती-पत्नी, न्या. व्यंकटराव देशपांडे आणि त्यांचे कुटुंबीय, काकांचे मित्र, नातेवाईक असा खूप गोतावळा जमला होता. लग्न किल्ल्यावर (आता जिथे बलभीम महाविद्यालय आहे, त्याच्या बाजूस) झाले. त्या काळी निदान दोन हजार लोक तरी लग्नाला हजर होते. तेव्हा माझे वय अठरा वर्षांचे आणि मला तशी काही समज नव्हती. लग्नाचा हा थाटमाट, श्रीमंत सासर यांचे मला अप्रूप नव्हते. उत्तम साड्या, दागिने हे सर्व मला मिळाले, पण ते समजण्याचे माझे वय नव्हते. माझ्या सासूबाई अतिशय हौशी होत्या. त्या काळात नववधू, तिच्याबरोबर एक मोलकरीण, घरातील आणखी कुणीतरी बाई, गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवा
कांच्या घरी जात असत. मोलकरणीजवळ चिवडा, लाडू, येसर, मेतकूट, खण असे साहित्य असे. ते प्रत्येक घरी जाऊन दिले जात असे. त्यानिमित्ताने आत्पेष्टांना नववधूचा परिचय होई. तिलाही या प्रसंगी आप्तेष्ट ब्लाउज पीस किंवा काही तरी भेट देत असत. हे सर्व त्या वेळी रीतसर आणि तेव्हाच्या प्रथेप्रमाणे झाले. सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे माझे सासू-सासरे अतिशय प्रेमळ, सुसंस्कृत होते. त्यांनी कधीही माझ्या आई-वडिलांकडून कोणती अपेक्षा केली नाही किंवा ‘आमचा मानपान केला नाही’ हे शब्दसुद्धा त्यांच्या तोंडून कधीही निघाले नाहीत.
काका हे स्वातंत्र्यसैनिक होते, पण सामाजिक काम करणारे होते व स्वतः गांधीवादी होते. त्यांनी कधीही पैशासाठी वकिली केली नाही. गरिबांची केस ते फुकट लढवत. बीडमध्ये सार्वजनिक कामांमध्ये काकांचा पुढाकार असे.
माझ्या सासूबाई – रमाबाई शिकलेल्या, चांगले वाचन असलेल्या तर होत्याच, तसेच सुगरण होत्या. अशा घरात आई-काकांच्या प्रेमळ सहवासात मी चाळीस वर्षे राहिले. पण कधीही आम्हा सासू आणि सुनेचे वाद झाले नाहीत. ‘थोडं काही वाटलं तरीसुद्धा ते सोडून द्यायचं’ हे माझ्या आई-वडिलांनी सांगितलेले होते. ‘आता हेच तुझे आई-वडील. यांच्याबरोबर प्रेमाने रहा,’ अशी शिकवण आई-वडिलांची होती.
पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी मराठवाडा मागासलेला होता असे अजूनही म्हणतात. आमचे घर फार उदारमतवादी आहे. माझे सासरे पुरुषोतमराव चपळगावकर उदारमतवादी होते, समाजात इतरांपेक्षा वेगळा विचार करणारे होते, त्यांचे विचार त्या काळापेक्षा पुढे जाणारे होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी नणंद सौ. उषा देशपांडे व यांची चुलतबहीण विजया चपळगावकर या दोघींना मॅट्रिकनंतर पुढे शिकण्यासाठी तेव्हा बीडला कॉलेज नव्हते म्हणून काकांनी औरंगाबादला पाठवले व दोघींचेही पूर्ण शिक्षण झाल्यावरच – म्हणजे नणंदेची पीएच.डी. व विजूताई पदवीधर झाल्यावरच – त्यांचे विवाह केले. खरं तर त्या काळी मुलींना दुसऱ्या गावी शिक्षणासाठी पाठवणे व शिकवणे हे ब्राह्मणांमध्येही जरा विरळाच होते. पण काकांनी हे केले, हे आज फार लक्षात घेण्यासारखे आहे.
माझे लग्न झाले तेव्हा बीडमध्ये नवऱ्याबरोबर बाहेर जाणे, फॅशनेबल राहणे हे अजिबात होत नसे. किंबहुना असे केले, तर टीका होत असे. नरेन्द्र यांनी या सर्व गोष्टीला फाटा दिला. आमच्याकडे स्कूटर होती. त्यांच्यामागे बसून (डबलसीट) मी पहिल्यांदा गावातल्या वाड्यात गेले. मला फार संकोच व भीती वाटत होती. ‘आता लोक काय म्हणतील’ असा प्रश्र्नही पडला होता. लग्न झाल्यावर त्या काळी हनिमूनसाठी जाण्याची तर फार पद्धत नव्हतीच. पण यांच्या हौशी मित्रांनी आमची खुलताबाद रेस्टहाउसमध्ये सोय केली. त्या वेळी खुलताबाद अतिशय छोटे गाव होते. डाक बंगल्यापासून गाव निदान दहा किलोमीटर्स तरी असेल. रेस्टहाउस खूप मोठे, तिथे आम्ही दोघेच. वीजपुरवठा खंडित होत असे त्यामुळे अंधाराची मला फार भीती वाटली. एखाद्या रहस्यमय जागी आपण आलो आहोत असेच मला तेव्हा वाटले.
तिथे गेल्यावर मला खूप ताप आला. मग डॉक्टरांची चौकशी केली. तर तिथे एक विटकर आडनावाचे डॉक्टर होते. त्यांच्या घरी आम्ही गेलो. तर त्यांची खूप जवळची ओळख निघाली. त्यांनी ट्रिटमेंट तर दिलीच, पण आम्हाला जेवायलाही बोलावले व फार आपुलकीने वागवले.
दोन दिवस झाल्यावर अशी बातमी आली की, औरंगाबादेत दंगल सुरू झालेली आहे. त्या काळी लवकर संपर्क साधण्याची सोय नव्हती. अण्णा भालेरावांनी टॅक्सी पाठवून आम्हा दोघांना औरंगाबादला आणून घेतले आणि त्यांच्या घरी ठेवूनही घेतले. खरं तर खुलताबाद हे मुस्लीम वस्तीचे गाव. पण तेव्हा तिथे कोणताही गोंधळ झालेला नव्हता.
नरेन्द्र बीडला वकिली करत होते. त्यांना अतिशय वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस. सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे राजकारण आणि समाजकारण! त्या वेळी नगरसेवक म्हणून निवडूनही आले होते. कोणतीही आणि कोणाचीही निवडणूक असली, तरी आमच्या घरी राजकारण्यांचा राबता असे. बापूसाहेब काळदाते दोन निवडणुकींत उमेदवार होते. त्या वेळीसुद्धा बरेच लोक घरी येत असत. कधीकधी तर निवडणूक प्रचाराला नरेन्द्र स्कूटरवर जात असत.
त्यांच्याप्रमाणे मलाही गाणे खूप आवडायचे. साहित्य खूप वाचायचे, सिनेमाचा तर काही प्रश्र्नच नव्हता. माझ्या वडिलांनाही संगीत, नाटक या सर्व गोष्टींची आवड होती. माझी आईसुद्धा छान गाणे म्हणत असे. आईच्या माहेरी तिचे मोठे भाऊ केशवराव मुकादम यांना गाण्याची प्रचंड आवड होती. एकही कलावंत अंबाजोगाईहून रिक्तहस्ते परत गेला नाही. मामांच्या घरी माडीवर सर्व कलावंतांचे गाणे होत असे. याचाही संस्कार कुठेतरी माझ्यावर झाला असेल.
खरं तर आमच्याजवळ चैन करण्याएवढे पैसे नव्हते, पण या गोष्टीला फार पैसे लागतात असेही नाही. लग्न झाल्यावर आम्ही पुण्याला दोन तीन नाटके पाहिली. ‘लेकुरे उदंड झाली’, ‘ययाती आणि देवयानी’ ही नाटकं बघितली. पुण्याला समाजवादी पक्षाची बैठक होती म्हणून आम्ही तिथे गेलो. आम्ही निळूभाऊ लिमयांच्या पूनम हॉटेलमध्ये राहिलो. खोलीचे भाडे रोजचे दहा रुपये एवढे होते. आमचे नुकतचे लग्न झाले आहे हे निळूभाऊंना समजल्यावर त्यांनी तर आम्हाला वरच्या मजल्यावरचा सुंदर ‘सूट’ राहण्यासाठी दिला. आम्हीही पुण्यात छान फिरत होतो. थोडीफार खरेदी केली. निळूभाऊंनी आदल्या दिवशी ‘चपळगावकरांकडून पैसे घेऊ नका’ असे स्टाफला सांगून ठेवले होते. पण दुसऱ्या दिवशीचा स्टाफ वेगळा होता. नियमाप्रमाणे त्यांनी आम्हाला बिल दिले. तर आमच्याजवळ वीस-पंचवीस रुपये तेवढे राहिले होते. मी तर एवढी घाबरून गेले होते की, आता पैसे उरले नाहीत तर बीडला परत कसे जाता येईल असा प्रश्र्न मला पडला. मी यांना आपण उगीच खर्च केला असे सारखे म्हणत होते, पण हे मजेत होते. तिथे काशिनाथ नावंदर व जेथलिया दोन वकील मित्र मीटिंगसाठी आले होते. त्यांच्याकडून शंभर रुपये घेऊन हॉटेल बिल दिले व आम्ही परतलो!
एकदा बीडला संध्याकाळी स्कूटर घेऊन दोघे गावाबाहेर फिरायला गेलो व एका पुलाच्या भिंतीवर बसलो. हातातली किल्ली फिरवता फिरवता ती खाली पडली. तिथे कचरा होता. त्यामुळे किल्ली सापडेना. मी घाबरले. संध्याकाळ झाली होती, अंधार पडत होता. तिथेच बाजूला पोलीस कॉलनी होती. एक पोलीस इन्स्पेक्टर यांचे मित्र होते. त्यांच्याकडून बॅटरी आणली व किल्ली शोधली व घरी आलो. खरंतर आता आम्ही खूप सुस्थितीत आहोत. पण तेव्हा फार पैसे नसतानाचा बीडमधील आमच्या कौटुंबिक मित्रांसोबतच्या गप्पागोष्टीतील, गाठीभेटीतील, घरगुती खाण्यापिण्यातील आनंद हा मनातून आलेला आनंद होता.
नरेन्द्रांबरोबर लग्न झाल्यामुळे कितीतरी समारंभ, संगीतमैफिली, नाटक, या गोष्टींचा आस्वाद घेता आला.
१९७२ किंवा ७३ साली विजय तेंडुलकरांची नाटके व त्यांवर त्यांचे भाषण असा चार दिवसांचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम आम्ही दोघांनी बीडहून औरंगाबादला मुद्दाम येऊन ऐकला आणि पाहिला. मला हा अनुभव नवाच होता. साहित्य क्षेत्रातील कितीतरी लेखक, कवी यांना जवळून पाहता आले व त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याचा योग आला. यात फार आनंद मिळाला. विंदा करंदीकर, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट या कवी मंडळींच्या कविता तर वाचल्याच, पण त्यांचा सहवासही लाभला. गंगाधर गाडगीळ, वि.स. खांडेकर, ना.सी. फडके, पु.भा. भावे, अरविंद गोखले, श्री.दा. पानवलकर, दि.बा. मोकाशी यांचे साहित्य मी आवडीने खूप वाचले. आमच्या काकांनी धोंडीपुऱ्यामध्ये एक वाचनालय सुरू केले होते. त्याचा फायदा सर्व विद्यार्थी व इतर लोकांना होत असे. वाचनालयात उत्तम पुस्तके, वर्तमानपत्रे असत. काका वाचनालयात रोज चक्कर मारत असत. रोज दोन पुस्तके आणून मी वाचत असे. सायली, मेघना तान्ह्या असताना त्यांना मांडीवर घेऊन एक पुस्तक पूर्ण करत असे.
आमचे लग्न झाले तेव्हा बीड छोटे शहर होते. आमचे घर गावाबाहेर होते. वीस हजार स्क्वेअर फुटांमध्ये घर होते. घराच्या बाजूला विहीर होती. ती पाण्याने भरलेली असे. विहिरीच्या बाजूला एक बोराचे झाड होते. ही बोरे गावरान होती, पण चवीला मेहरूनच्या बोरांसारखी होती. बोराच्या मोसमामध्ये मोठी बादली भरून भरून बोरे निघत. कॉलनीतील मुले येऊन घेऊन जात. बागेमध्ये पेरूची झाडे, शेवग्याच्या शेंगाचे झाड, जांभळाचे झाड होते. बाग खूप खूप छान केली होती. गुलाब, मोगरा अशी फुलझाडे होती. रोज टोपलीभर फुले काढली, तरी झाडांवर अजून फुले शिल्लक राहत. बागेत नेहमी विंचू, सापही निघत असत. त्या काळी घरामध्ये टॉयलेट नसे. बागेच्या एका कोपऱ्यात स्वच्छतागृह बांधलेले होते. एकदा मी तिथे गेले असता खिडकीत एक मोठा साप बघितला म्हणून मी बाहेर यायला लागले, तर बाहेरही साप होता, मी तिथून कशीबशी पळून आले. भक्तीला बागेत फिरण्याची आवड. तिला शोधत मी एकदा बागेत गेले, तर भलामोठा काळा साप व त्याच्या बाजूला मुंगूस होते. भक्ती अगदी जवळच खेळत होती. मुंगसाने सापाचे फक्त तोंड तोडले होते, पण तो फार वळवळ करत होता. त्याची भक्तीला काहीही जाणीव नव्हती. तिला सांभाळण्यासाठी जगदाळे नावाचा गडी होता. तो सतत भक्तीला घेऊन बागेतच असे. पेरूच्या झाडाखाली तिला पाटावर बसवून जेवू घालत असे.
घरावर पत्रे होते व दोन हॉलवर तारस होते. तारस म्हणजे विटा आणि लोखंड यांच्या साह्याने केलेले छत. दोन स्वयंपाकघरे; एक चूल असलेले, त्याच्या बाजूला कोपऱ्यात मोरी बांधलेली होती. सोवळ्यातला स्वयंपाक या स्वयंपाकघरात होत असे. त्याच्या बाजूला एक गॅसचा ओटा होता. त्या काळी काकांनी घरात गॅस घेतले होते. बीडमध्ये कोणाच्याही घरी गॅस नसेल, पण आमच्या घरी काकांनी गॅस आणला होता, या गॅसचे सिलिंडर नगरहून येत असे. या स्वयंपाकघरातही मोठी मोरी होती. मोठे देवघर होते. देवाची पूजा करायला वासुदेव काका नावाचे म्हातारे गृहस्थ येत असत. नवीन लग्न झाल्यावर देवाला ओवळण्यासाठीची सोन्याची अंगठी मी एकदा देवासमोरच विसरले व माहेरी गेले. पण वासुदेव काकांनी ही अंगठी सासूबाईंजवळ दिली व म्हणाले, ‘पोरगी अंगठी विसरली वाटतं.’ बागेसाठी पंडित नावाचा माळी होता. तो दिवसभर झाडाला पाणी देत असे. त्यामुळे झाडे कायम हिरवीगार व रसरसशीत दिसत. कपडे धुवायला आसाराम धोबी रोज येत असे. घरीच कपडे धुऊन तो निघून जात असे. हे घर माझे स्वप्नातले तर होतेच. या घराची ओढ व आठवण जन्मभर राहणार आहे. बीडला असतानाच माझ्या चारही मुलांचा जन्म झाला. मला त्रास होत असल्याने मला सायलीच्या वेळेस बाळंतपणासाठी डॉ. भागवत यांच्या हॉस्पिटलमध्ये चार महिने ठेवले होते. पहिले मूल म्हणून सायली सगळ्यांची लाडकी. त्यानंतर चार वर्षांनी मेघनाचा जन्म झाला आणि दोन वर्षांनी भक्ती आणि पाठोपाठ श्रीधरचा जन्म झाला. श्रीधरचे नाव नरेन्द्र यांचे वैचारिक गुरू एस. एम. जोशी यांच्या नावावरून ठेवण्यात आले. बीडमध्ये अनेक कुटुंबांशी आमचा फार जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध होता आणि आहे. तिथल तेव्हाचे दिवस हे आमच्या आयुष्यातील खूप चांगले दिवस होते. आनंदाला पैसे लागत नाहीत. काही क्षण व काही दिवस हे आनंद देऊनच जातात.
तेव्हा आम्ही औरंगाबादला अधूनमधून येत होतो. नरेन्द्र तेव्हा विद्यापीठाचे विधी सभा आणि कार्यकारी मंडळावर होते. औरंगाबादला आल्यावर आमची दोन सख्खी घरे होती. एक अनंतराव भालेराव ऊर्फ अण्णा यांचे, तर दुसरे घर सुधीर रसाळ यांचे. या दोघांचीही घरे आम्हाला कधी परकी वाटलीच नाहीत. अण्णांच्या घरात तर यांच्या आवडीचा स्वयंपाक, आवडीचे जेवण सुशीला वहिनी करत. अण्णांनी आणि सुशीला वहिनींनी यांच्यावर मुलासारखे प्रेम केले. दुसरे घर म्हणजे सुधीर रसाळांचे. रसाळांचे घर गोकुळासारखे भरलेले होते. चार बहिणी, दोन भाऊ, आई-वडील, काकू एवढ्या गर्दीत आम्हीही सामावून जात होतो. औरंगाबादला आल्यावर आधी रसाळ-बापू आणि सुमती वहिनी यांच्या घरी आम्ही हक्काने जात होतो. घर लहान होते, पण घरातली माणसे माया करणारी होती. रसाळांच्या आई-बाई सुग्रास व चविष्ट स्वयंपाक करत असत व त्यांना घरी आलेल्या सर्वांना खाऊ घालणे फार आवडे. ‘अगं बाई भूक नाही’ असे म्हटल्यानंतरसुद्धा त्यांचा जेवायचा आग्रह कायम असे. रसाळांचे वडील-भाऊ मोसमातील फळे, भाज्या, ओल्या शेंगा, टाहाळ आणत. हे आणले की, त्यात ते सर्वांचा वाटा करून ठेवत असत. कामांचीसुद्धा वाटणी होती. सर्व मिळून घरातील कामे करत. घरातील मोठा मुलगा म्हणून रसाळांवर व सुमतीवर खूप जबाबदारींचे ओझे होते. बहिणींची लग्ने, भावाचे शिक्षण-लग्नं या सर्व जबाबदाऱ्या सुमती वहिनी व बापूंनी आनंदाने पार पाडल्या. बापूंचे नातेवाईकही औरंगाबाद जवळच राहत होते. त्यांचाही राबता बापूंच्या घरी खूप असे. पण त्यांच्या घरी गेलेल्यांचे नेहमी आदरातिथ्य होतच असे. सगळ्यात गंमत म्हणजे त्यांचे घर अगदी गुलमंडीच्या जवळ होते व रस्त्यावर होते. बापूंची आजी कायम खिडकीत बसलेली असे व रस्त्यावर आणि घरात दोन्हीकडे तिचे लक्ष असे.
तु.शं. कुलकर्णी, चंद्रकांत भालेराव, म.द. पाध्ये, त्र्यंबक महाजन हेही चपळगावकरांचे कॉलेजचे घनिष्ठ मित्र औरंगाबादेत होते.
माझे लग्न झाल्यावर माझे आई-दादा खूपच खूश होते. एक तर चपळगावकरांसारखे मला सासर मिळाले. सज्जन व प्रेमळ माणसे! त्यांना याचे फार समाधान वाटले. खरं तर आमची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तरीही माझ्या आई-दादांनी माझे खूप लाड केले. दादांना नरेन्द्रांसारखा जावई मिळाल्याचे खूपच समाधान वाटले. नरेन्द्र यांच्या कर्तृत्वावर, हुशारीवर त्यांचा खूपच विश्र्वास होता. ते मला सतत म्हणत ‘तुझा नवरा म्हणजे लाथ मारेल तिथे पाणी काढणारा आहे. तुला सुखात ठेवणारा आहे.’ आता वाटते त्यांचे शब्द खरे ठरले. नरेन्द्रांनी आधी खूप नोकऱ्या केल्या. आधी शिक्षक झाले, लातुरात प्राध्यापक झाले. पत्रकार झाले, नंतर वकील झाले. वकिलीत मात्र स्थिरावले. त्यांच्या वकिलीची सुरुवात अण्णा तुंगार म्हणजे नरहरराव तुंगार यांच्याकडे झाली. काकांनी त्यांना फौजदारी काम शिकण्यासाठी अण्णा तुंगारांकडे पाठवले. आमच्या बाजूलाच रामचंद्रराव देशपांडे नावाचे वकील होते. ते फौजदारी वकील म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची फौजदारी प्रकरणे ऐकण्यासाठी व ऑर्ग्युमेंट ऐकण्यासाठी नरेन्द्र व त्यांचे मित्र कोर्टात बसत. मला आठवते, बीडला जेव्हा कवी, लेखक येत तेव्हा आवर्जून आमच्या घरी येत असत. एकदा कवी बा.भ. बोरकर बीडला आले व आजारी पडले. त्यांनी नरेन्द्रांना कळवले की, ते आजारी आहेत. यांनी त्यांना घरी ठेवून घेतले. डॉ. गोविंद जोशी यांनी उपचार केले. बोरकरांना मराठवाड्यातले तिखट व मसालेदार खाणे सहन झाले नाही. एवढा मोठा कवी आमच्या घरी आला आणि राहिला, हे आमचे किती भाग्य!
माझे लग्न झाले तेव्हा आमच्या बंगल्या शेजारी फार कमी वस्ती होती. त्यात लऊळकरांचा बंगला, रामचंद्र रावांचा बंगला असे दोन चार बंगले सोडले, तर फार वस्ती नव्हती. आमच्या घरातून बसस्टँड दिसत होते. त्यामुळे कोणीही पाहुणा त्याला वेळ असला, की सहज घरी येऊन चहा-फराळ घेऊन जात असे.
१९७५ ला इंदिरा गांधींनी अणीबाणी जाहीर केली. ही बातमी काकांनी रेडिओवर ऐकली व आम्हाला सांगितली. तेव्हा सर्व देशभर धरपकड झाली. महत्त्वाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले गेले. अनेक नेत्यांनी अणीबाणीला विरोध केला होता. सामान्य नागरिकसुद्धा सजग झाले होते. महत्त्वाच्या नेत्यांना अटक करून जेलमध्ये टाकले होते. बापू काळदाते, अनंतराव भालेराव, म.द. पाध्ये, मोहन धारिया, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे नाशिक जेलमध्ये होते. मृणालताई गोरे, पन्नालाल सुराणा, मधू दंडवते, प्रधान मास्तर आदी भूमिगत होते. त्या काळात मृणालताई वेषांतर करून पंजाबी ड्रेस घालून आमच्या घरी राहिल्या होत्या. एकदा एक दाढी वाढवलेले गृहस्थ चट्ट्यापट्याचा कोट घालून संध्याकाळी घरी आले. मी त्यांना ओळखलेच नाही. मी नरेन्द्रांना सांगितले की, बाहेर कोणीतरी आले आहे. यांनी बाहेर जाऊन बघितले, तर ते प्रधान मास्तर होते. तेव्हा मेघनाच्या वेळी मला दिवस होते व आठवा महिना होता. जॉर्ज फर्नांडिस यांची सभा बीडला झाली. जॉर्ज आमच्याकडेच उतरले होते. जॉर्जची सभा प्रचंड मोठी झाली. त्या काळात एवढी मोठी सभा बीडमध्ये पहिल्यांदाच झाली असावी. त्या सभेलाही मी उपस्थित होते व घरी आल्यावर सर्वांची जेवणे झाली. नंतर मधू दंडवते आले, डॉ. अरुण लिमये येऊन गेलेले. अणीबाणीत रोज आमच्या घरी बीडला कोणी कोणी मुक्कामाला असत.
एक दिवस हे सकाळी दहा वाजता जेवण करून कोर्टात गेले व संध्याकाळ झाली तरी आलेच नाहीत. रात्र झाली. दुसऱ्या दिवशीही ते परतले नाहीत. मग मला व काकांना खूप काळजी वाटू लागली. तेव्हा संपर्काची साधनेही नव्हती. काळजी करण्याशिवाय हातात काहीच नव्हते. पण एक पक्षकार घरी आले व सहज बोलता बोलता काकांना म्हणाले की, त्यांनी ‘धाकट्या वकील साहेबांना’ नगरच्या गाडीत पाहिले. ते असे बोलल्यावर आम्हाला बरे वाटले. चौथ्या दिवशी हे घरी आल्यावर त्यांच्याकडूनच असे कळाले की, ते नाशिक जेलमध्ये असलेल्या लोकांना भेटायला गेले होते. पहिल्यांदा अण्णा भालेराव यांना भेटायचे होते, पण त्या दिवशी अण्णांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येणार होते, त्यामुळे जेलमध्ये एका दिवशी दोन माणसे भेटायला येऊ शकत नाहीत, असे यांना सांगण्यात आले. ते ऐकून हे बाहेर निघाले असता यांना परिचयातील एक पोलीस सब इन्स्पेक्टर भेटले व त्यांनी यांच्याकडे चौकशी केली. त्या इन्स्पेक्टरने आत गेल्यावर अण्णांची भेट तर घडवलीच, पण बाकीच्या मित्रमंडळींची – बापू काळदाते, म.द. पाध्ये, मोहन धारिया आदींचीही भेट घडवली व नंतर एकाकडून रजिस्टवर लिहून घेतले की, ‘नरेन्द्र चपळगावकरांना मला भेटायचे नाही.’ त्या वेळीची अजून एक आठवण म्हणजे आष्टीचे बबनराव देशपांडे हे यांचे मित्र. त्यांनाही वॉरंट होते. त्यांच्या अटकेपूर्वीच्या रात्री नरेन्द्रांनी त्यांना सांगितले की, ‘तू ऑफिसची काळजी करू नको. कुटुंबीयांची काळजी करू नकोस. मी सर्व व्यवस्था करेन.’ त्याप्रमाणे हे दर आठवड्याला जाऊन बबनरावांच्या कुटुंबीयांची भेट घेत व ऑफिसचे काम करत.
अणीबाणी संपली. यांनी पुन्हा वकिलीचे काम व्यवस्थित सुरू केले. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. कानडे, न्या. कुर्डूकर यांचा बीडला सत्कार झाला. त्यात न्या. कानड्यांनी भाषण केले की, बीडलाही हुशार वकील आहेत व नंतर प्रत्यक्ष भेटल्यावर यांना सांगितले की, बीडलाच न राहता मुंबईत वकिली करायला पाहिजे. मग यांच्याही मनात मुंबईत वकिली करण्याचे विचार सुरू झाले. खरं तर आमच्याजवळ बँकेत पैसेच नव्हते. बरं, माझ्या माहेरी जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. मी तर इतकी घाबरून गेले की, ‘मुंबईला तुम्ही जाऊच नका. आपण नवीन घर बांधलेले आहे, आपल्याला चार मुले आहेत, अशा परिस्थितीत आपल्याजवळ पैसेही नाहीत. घर, प्रपंच कसा चालेल’ असे मी म्हणत असे. मला खूप काळजी वाटत होती. बरं, त्यात मी मुंबई पाहिलीच नव्हती. मी अतिशय अस्वस्थ झाले होते की, आपले कसे होणार? पण यांचाही निश्र्चय कायम होता. आधी हे मुंबईला गेले, राहायला जागाही नव्हती. यांचे मित्र डी.के. देशमुख हे आमदार होते. आमदार निवासातील त्यांच्या एका खोलीत हे राहू लागले व तिथूनच काम करू लागले. पुढचा कोणताही विचार नव्हता.
डॉ. खरवडकर हे आमचे मित्र होते. त्यांच्या भावाचा (प्रकाश खरवडकर) फ्लॅट मुलुंडला होता. तो फ्लॅट प्रकाशने मोठ्या मनाने आम्हाला दिला. पागडी नाही, इतर पैसे नाहीत, त्यात त्यांचा गॅस व थोडे फर्निचर होते. दोन वर्षांनंतर मी घर पाहायला गेले. मला लोकल रेल्वेची माहिती तर अजिबातच नव्हती. श्रीधर वर्षाचा होता. त्याला कडेवर घेऊन दुसऱ्या हातात पिशवी घेत जलद लोकलमध्ये आम्ही बसलो. मुलुंड आल्यावर गाडी थांबली. हे उतरून गेले. पण मला उतरताच आले नाही. पुढच्या स्टेशनवर घाटकोपरला मी खाली उतरले व तिथे थांबले. नंतर दोघे मिळून आम्ही परत मुलुंडला आलो.
बीडला बाजारात जाणे, दळण आणणे, बाजार करणे या गोष्टी मला कराव्या लागत नसत. मुंबईत आल्यावर यांनी मला बजावले की, आपण घरदार सोडून इथे आलेलो आहोत, मी घरातल्या कामाला हात लावू शकणार नाही. हे सकाळी आठला जायचे व रात्री आठला परतायचे. मोठी मुलगी नऊ वर्षांची, दुसरी पाच, तिसरी तीन व मुलगा दोन वर्षांचा अशी चार छोटीछोटी मुले घेऊन मुलुंडला मी बस्तान बसवले. ‘वात्सल्य’ या इमारतीत आम्ही राहत होतो. तिथेही आम्हाला मदत करणारे शेजारी होते.
यांच्याकडे आता कोर्टातील काम येण्यास सुरुवात झाली होती. एकदा हे सकाळी आठला हायकोर्टात गेले व रात्री परतलेच नाहीत. स्वयंपाक केलेला होता, पण मुले आणि मी जेवलोच नाही. मुले लहान असल्यामुळे झोपून गेली, पण मला मात्र काळजी वाटू लागली. संपर्क करूच शकत नव्हते. समोर प्रभूदेसाई म्हणून कुटुंब होते, त्यांच्याकडे फोन होता. मन घट्ट करून त्यांच्या दरवाजावरची बेल वाजवली व त्यांना अडचण सांगितली, की हे अजून आले नाहीत. पण त्यांनी मला धीर देण्याऐवजी अस्वस्थ केले. त्या म्हणाल्या, ‘‘त्यांनी तुम्हाला फोन नंबर दिला आहे काय?’’ तर माझ्याजवळ फोन नंबर नाही. मुंबईमध्ये येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कुठे जाणार आहेत, मित्रांचे फोन नंबर असे तपशील लागतात. पण माझ्याजवळ हे काहीच नव्हते, माझ्या कधी लक्षातही आले नाही की या गोष्टींची मला माहिती असायला हवी. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला हे घरी आले. मला तर संताप आला आणि रडूही आले. यांनी मला सांगितले की, ‘मी रात्री वांद्य्राला वा.ल. कुलकर्णींकडे गेलो होतो व तिथेच राहिलो.’ खरं तर मलाही कळायला पाहिजे होते की, मराठवाड्यातल्या लोकांना व्यवस्थित निरोप ठेवणे किंवा फोन करणे याची सवय नाही.
१९८२ साली औरंगाबादला हायकोर्ट सुरू झाले. आम्हाला याचा खूप आनंद झाला. कारण असे होते की, मुंबईत त्या काळातही आम्ही घर घेऊ शकत नव्हतो. मुले लहान होती, औरंगाबादला आल्यावर सर्व संसार व्यवस्थित सुरू झाला. मुलींना शारदा मंदिरमध्ये प्रवेश मिळाला. श्रीधर, भक्ती यांना शेजारच्याच शिशुविकास नावाच्या बालवाडीत घातले. आमचे नातेवाईक भगवानकाका, ते आजोबांचे सख्खे मावसभाऊ, त्यांच्या बाजूलाच त्यांनी घर मिळवून दिले. त्यावेळी उस्मानपुऱ्यात वस्ती खूप कमी होती. नरेन्द्रांची वकिली खूप चालत होती. मराठवाड्यातील अनेक ठिकाणांहून पक्षकार येत होते. त्याचबरोबर साहित्य आणि संगीताची आवड जोपासायला वेळही मिळत होता. रोज कोर्टातून आल्यावर हे अनंतराव भालेराव (अण्णा) यांच्याकडे जात. तिथे अण्णा, सुधीर रसाळ (बापू) भगवंतराव देशमुख आणि हे गप्पागोष्टी करत असत. तिथे समाजकारण, राजकारणावर चर्चा, एकमेकांची थट्टा करणे हे होत असे. संध्याकाळी आल्यावर ऑफिस सुरू होत असे ते रात्री अकरा­बारापर्यंत काम करत असत व दुसऱ्या दिवशी सकाळी सहापासून पुन्हा ऑफिस, कोर्टात जाईपर्यंत काम सुरूच असे. उस्मानपुऱ्यातले घर आम्हाला लहान पडत असे. चार खोल्यांपैकी एका खोलीत ऑफिस आणि इतर खोल्या आम्ही राहण्यासाठी वापरत असू. आमचे घरमालक चंद्रकांत क्षीरसागर व मंगल, त्यांची मुले यांचे आम्हा सर्वांबरोबर प्रेमाचे संबंध होते. पण शेवटी स्वतःचे घर हवेच. म्हणून आम्ही जयनगरला सहा हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट घेतला व त्यावर घर बांधले. मुलांसाठी, आजी-आजोबांसाठी, पाहुण्यांसाठी घरात सोयी केल्या. यांचे ऑफिसही मोठे केले. या घरातच आजी-आजोबा, मुले, माझे दीर-जाऊ, त्यांची मुले एवढे जण आम्ही राहत होतो.१९९० साली हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्या वेळी न्यायाधीशांचे पगार कमी होते. मला वकील असताना खर्च करण्याची सवय लागलेली होती. म्हणजे किराणा, दूध, भाज्या हे सर्व मी मोकळेपणाने घेत असे. पण आता यांवर मर्यादा आली होती. मुली वाढत्या वयाच्या व कॉलेजमध्ये जाणऱ्या होत्या. आम्ही एकाही मुलीला ट्यूशन लावली नाही. त्याची गरजही वाटली नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना वाचनाची खूप सवय लागली. आमच्या घरात पैशापेक्षाही पुस्तकांची लयलूट आहे. याचा परिणाम मुलींचा कल वाचनाकडे वळण्यात झाला. मोठी सायली ही बहुश्रुत आहे. तिला साहित्य, संगीत, कला यांची खूप आवड आहे व आता ती मोठी उद्योजिका झाली आहे. दुसरी मुलगी मेघना हिला वाचन, स्वयंपाक, साहित्य, संगीत यांची आवड आहे. तसेच तिने काही दिवस वकिलीही केली. तिसरी मुलगी भक्ती हिने रानडे इन्स्टिट्यूट, पुणे येथून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. मराठवाडा दैनिकातून तिच्या पत्रिकारितेला सुरुवात झाली नंतर ई टीव्ही, स्टार न्यूज, आजतक, एबीपी माझा आदी चॅनल्समध्ये तिने उत्तमरीत्या काम केले. सर्वांत धाकटा मुलगा श्रीधर तोही आता रिअल इस्टेटमध्ये काम करतो आहे. त्याची पत्नी निताशा अतिशय समंजस व प्रेमळ आहे.
तिन्ही जावई अतिशय सुस्वभावी आहेत. मोठा जावई निरंजन राजाध्यक्ष, दुसरा सिद्धार्थ पाटील आणि तिसरा अजय भाळवणकर हे आमचे जावई नसून मुलेच आहेत. सगळ्यात मनाला आनंद देणारी आमची नातवंडे आहेत. सावनी, शर्वरी या सायलीच्या दोन गोड मुली. मेघनाची जानकी ही तर लहानपणापासून माझ्याजवळ असल्यामुळे तिला माझा फार लळा आहे. अर्थात, सहवासाची माया ही जानकीने लावली. भक्तीची दोन मुले निस्सिम आणि शरयू, तसेच श्रीधरची दोन मुले आकाश आणि निहार आम्हाला आनंद देणारी आहेत. असा आमचा बहरेलला संसार आहे.
मला आयुष्यात चांगला जोडीदार मिळाला. जीवनातील आनंद हा पैशावर नसून आपल्यावर प्रेम करणारा सहचर लाभणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मला आयुष्याने खूप दिले. मी आनंदात आहे. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. साहित्य, संगीत, मोठ्या लोकांचा सहवास, पुस्तकांची आवड जोपासता आली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे चपळगावकर भाऊबंद हे एकमेकांना धरून राहतात. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. ही आमच्यादृष्टीने खूप समाधानाची गोष्ट आहे.

सायली राजाध्यक्ष (बाबा आणि मी)

माझ्या लग्नाला आता दहा वर्षं होतील. पण अजूनही माझा आणि बाबांचा रोज एक फोन असतोच. बरं, आम्ही फोनवर बोलतो ते काही महत्त्वाचे विषय नसतात, अगदी ‘आज तुम्ही काय जेवलात? कुठे गेला होता? दिवसभरात काय काय घडलं?’ अशा अगदी साध्या बाबींवर आमचं बोलणं होतं. पण रोज एक फोन हा व्हायला हवाच! मला, निरंजन – माझा नवरा तर म्हणतो की, तुम्ही एक फॅमिली न्यूजलेटर का नाही काढत, कारण रोज तेच तेच बोलत असता! पण खरं सागायचं तर दहा वर्षं झाली, तरी अजून रोज बाबांशी बोलल्याशिवाय करमतच नाही.
आमचं मूळ गाव बीड. एखाद्या व्यक्तीच्या विकासाला अशा लहान गावात ज्या मर्यादा पडू शकतात, त्या बाबांनी मात्र कधी पडू दिल्या नाहीत. म्हणजे घरी तसं वातावरण चांगलंच होतं, पोषक होतं. पण आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि नंतरही विशिष्ट तत्त्वांशी इमान राखून वकिली करणारे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम होती अशातला भाग नाही. नंतर बाबाही काही काळ प्राध्यापकी करून वकिलीकडे वळले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीसाठी जायचं ठरवलं, कुठलंही पाठबळ नसताना ते यशस्वी झाले आणि नंतर न्यायमूर्तीही. बाबा मुंबईला असताना आम्ही बीडलाच होतो. मला आठवतं, जेव्हा ते बीडला यायचे तेव्हा दर वेळी आमच्यासाठी काहीतरी नवलाईच्या गोष्टी घेऊन यायचे. जाताना आम्ही त्यांना एस.टी. स्टँडवर सोडायला जायचो ते दृश्य अजूनही मला लख्ख आठवतंय. मुंबई-बीड असा एस.टी.चा प्रवास मला कुणी करायला सांगितला तर मी नाही करू शकणार, पण बाबा हा दिव्य प्रवास महिन्यातून किमान एकदा तरी करत असत. नंतर उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला स्थापन झालं आणि आम्ही औरंगाबादला आलो. इथेही बाबांनी अनेक अडचणींतून उत्तम यश मिळवलं.
आता विचार केला की वाटतं, आज आम्ही मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे असं म्हणत असतो. आजकालचे पालक त्याविषयी जागरूकही असतात; पण आम्ही लहान असताना अशा प्रकारची कुठलीही संकल्पना प्रचलित नसताना आई-बाबांनी नकळत आम्हाला असा वेळ निश्चितच दिला.

लहान असल्यापासून आजूबाजूला कायम पुस्तकं बघितल्याने आपोआपच आम्हा बहिणींना वाचनाची सवय लागली. घरात माणसांची कायम वर्दळ असल्याने कितीतरी सुसंस्कृत आणि असंस्कृतही व्यक्तींना बघायची संधी मिळाली. कुठलीही नवी व्यक्ती घरी आली, तर तिच्याशी आम्ही बाहेर येऊन बोललंच पाहिजे असा बाबांचा कटाक्ष असायचा. त्यात टाळाटाळ केलेली त्यांना चालायची नाही. आमच्या घरी कायम माणसांचा राबता असे आणि अजूनही असतो. पूर्वसूचना न देता घरी जेवायला आमंत्रण देण्यात बाबांचा हात कुणीही धरू शकणार नाही. बिचारी आई होती म्हणूनच तिने कित्येकदा नापसंती व्यक्त करून का होईना आगंतुक पाहुण्यांना जेवू घातलंय.
खाण्याच्या बाबतीत बाबांच्या अतिशय खोडी आहेत. (सॉरी, ते अतिशय चोखंदळ आहेत!) साधं वरण इतपतच गोड असावं किंवा त्यात हिंग किती असावा अशासाठी बाबा नेहमी कटकट करत असतात. त्या एका बाबतीत त्यांनी आईला नेहमीच धारेवर धरलंय. रोज जेवताना भाजीत मीठ जास्त आहे, वरणात गूळ कमी आहे वगैरे तक्रारी ते करत असतात. एकदा गोव्यात सिटिंग असताना दिवसभराचा प्रवास करून आम्ही संध्याकाळी गोव्यात पोहोचलो. बरोबर आई नव्हती. खानसाम्याने जे काही सामान आणलं होतं त्यातून मी खिचडी केली, ती अर्थातच बाबांना पसंत पडली नाही! त्यांनी विचारलं, ‘‘दुसरं काही मिळेल का?’’ मी बाबांना सांगितलं की, ‘आता काही मिळणार नाही कारण मी थकले आहे आणि मी आई नाहीये.’ वर असंही म्हणाले की, आईच्या जागी असते तर केवळ या मुद्यासाठी??? घटस्फोट घेतला असता! पण बाबा माझ्याबरोबर जेवताना घाबरतात. ते जेव्हा मुंबईला माझ्याकडे येतात तेव्हा कुठलीही टीका न करता पानात पडेल ते खातात. बिचारे!
बाबा अतिशय हळवे आहेत. त्यांना कुठलंही दु:ख अजिबात सहन होत नाही. आजोबांचं आजारपण असो की अगदी नातवंडांपैकी कुणाला साधा ताप असो, ते काळजी करत बसतात. प्रत्यक्षात दुसऱ्यांना सांगतात की, त्यात काय आहे काळजी करण्यासारखं, पण स्वत: मात्र पुन्हा पुन्हा चौकशी करतात. कितीतरी लोकांना बाबांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत केली आहे. मला आठवतं, औरंगाबादला असताना एक अतिशय म्हातारा पक्षकार आला होता, अगदी हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेला. बाबांनी त्याची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आमच्या घरीच केली होती. त्या माणसाच्या मुलीला सासरच्यांनी जाळून मारलं होतं. बाबांनी त्याच्याकडून आपली फीही घेतली नाही. अर्थात बाबांकडून हवी ती मदत घेणाऱ्या काही माणसांनी त्यांना चांगला इंगाही दाखवला आहे; पण बाबा ते लक्षात न ठेवता, सगळं विसरून पुन्हा त्या माणसाशी नेहमीसारखं वागतात आणि मला त्यांचा हा स्वभाव अजिबात आवडत नाही. न्यायमूर्ती म्हणून काम करताना प्रामाणिकपणे काम करण्यासाठी बाबांनी कित्येकदा मनस्तापही सहन केला. या गोष्टी त्या वेळी त्यांनी आमच्यापर्यंत येऊ दिल्या नसल्या, तरी आता त्या मला जाणवतात.
चारी मुलांमध्ये बाबांशी सर्वाधिक भावनिक गुंतवणूक माझी आहे आणि त्यांचंही माझ्यात आहे, निदान मी तरी तसं समजते! त्यांनी नेहमी माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या. मी मेरिटमध्ये यावं, मी स्पर्धा परीक्षा द्याव्यात असं त्यांना नेहमी वाटायचं. पण मला अशा गोष्टींमध्ये रस नव्हता. आज माझं हस्ताक्षर चांगलं आहे, कारण मी दहावीत असताना बाबा माझ्याकडून शुद्धलेखन लिहून घेत असत. गंमत म्हणजे काही बाबतींत बाबा आजोबांपेक्षा पारंपरिक आहेत. म्हणजे मी चित्रकार किंवा गायक किंवा ब्युटिशिअन असा काहीसा मार्ग निवडला असता, तर त्यांना तो रुचला नसता, म्हणजे ते तसं प्रत्यक्ष बोलणार नाहीत, पण मला माहीत आहे. मी मुलांशी मैत्री केलेलीही त्यांना रुचायची नाही. माझे मित्र घरी आले किंवा मी त्यांच्याबरोबर बाहेर गेले, तर ते अस्वस्थ असायचे. नंतर मेघना आणि भक्ती कॉलेजला जायला लागल्यावर त्यांचे मित्रही घरी यायला लागले, आणि बाबा हळूहळू ‘लिबरल’ होत गेले!
प्रवासाला जाणं ही बाबांची अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. मग त्यात सामाजिक कार्यक्रमांसाठीचे प्रवास असोत, सदिच्छा भेटी असोत वा कौटुंबिक सहली असोत, बाबा अतिशय उत्साहाने प्रवासाची आखणी करत असतात. माझ्या लग्नापूर्वी आम्ही भारतातली कितीतरी राज्यं बघितली. प्रत्येक प्रवासापूर्वी प्रवासाच्या ठिकाणांची माहितीपत्रकं गोळा करायची, नकाशे जमवायचे इथून आमच्या सहलींच्या आखणीला सुरुवात व्हायची. औरंगाबाद ते आग्रा असा प्रवास आम्ही कारने केलाय! राजस्थानध्ये कडाक्याची थंडी असतानाही सकाळी पाचला प्रवासाला सुरुवात झालीच पाहिजे असा बाबांचा आग्रह असायचा. कितीही चिडचिड झाली, तरी शेवटी त्यांचंच ऐकावं लागे. पंधरा दिवसांत तेरा गावं अशी यात्रा कंपन्यांनाही लाजवेल अशी आमची सहल असायची. माझा नवरा तर बाबांबरोबर प्रवास करायला घाबरतोच. मी कधीकधी कंटाळून म्हणायचे की, मला प्रवासाला यायचं नाहीये. तेव्हा बाबा म्हणायचे की, हौस नसलेला नवरा मिळाला तर मग प्रवासच होणार नाही, आणि त्यानुसारच आता माझी चांगली जिरली आहे कारण निरंजनला प्रवासाचा कंटाळा आहे.
अतिउत्साह आणि कुठल्याही गोष्टीत प्रमाणापेक्षा जास्त गुंतणं, या दोन्ही बाबींवरून माझ्यात आणि त्यांच्यात खूप खटके उडत असतात. कुठल्यातरी माणसाला बरं वाटावं म्हणून त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी तीनशे किलोमीटर्सचा प्रवास करून जावं असं मला वाटत नाही आणि बाबांना ते नैसर्गिक वाटतं. बाबांनी निदान आतातरी आपले प्राधान्यक्रम बदलावेत असं मला वाटतं. त्यांनी जास्तीत जास्त वेळ लेखनाला आणि घराला द्यावा असं आम्हा सर्वांना वाटतं, पण त्यांना ते अजिबात मान्य नाही म्हणून हल्ली गावाला जाताना ते मला सांगतच नाहीत. दोन-तीन दिवस त्यांचा फोन आला नाही की, समजावं की ते कुठेतरी दौऱ्यावर आहेत. बरं, तिथून फोन करावा तर मला सांगावं लागणार की, ते कुठे आहेत! मग परत आल्यावर मी त्यांना विचारते की झाल्या का लष्कराच्या भाकरी भाजून! ते बिचारे काही तरी उडवाउडवीची उत्तरं देतात. दुसऱ्यांना अनहूत सल्ला देणं हेही बाबांकडून आपोआपच होत असतं म्हणजे उदाहरणार्थ, कुणी प्रवासाला जाणार असेल की त्यांनी त्याची आखणी कशी करावी हे बाबा आपणहून सांगतात (अर्थात, हा अनाहूत सल्ला नाही कारण त्यात त्यांचा हात कुणीच धरू शकणार नाही!). यातला गमतीचा भाग सोडा, पण समोरच्या माणसाला ते आवडत नाही तर तुम्ही का सांगता, असे मी त्यांना विचारते पण त्यांच्याकडून ते नकळत होत असतं, त्याला ते काहीच करू शकत नाहीत.
बाबांच्या लेखनाविषयी मी काय लिहिणार! निवृत्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना आताच लिखाणाला वेळ मिळतोय. स्वामी रामानंद तीर्थांवरच्या पुस्ताकासारखी आणखी पुस्तकं त्यांनी लिहावीत असं मला वाटतं.
मेदककर काकांचा जेव्हा या लेखासाठी फोन आला तेव्हा मला वाटलं की, आपण बाबांविषयी तटस्थपणे कसं लिहिणार? पण नंतर विचार केल्यावर वाटलं की, तशी कोणाचीच अपेक्षा नसते. त्यानिमित्ताने आपल्याला त्यांच्या आपल्यातल्या नात्याविषयी विचार करायला एक संधी मिळते आहे आणि आपण ती घेतली पाहिजे.

भक्ती चपळगावकर (आमच्या ‘उत्कट’ जगण्याला बाबांच्या ‘उत्तुंगते’ची किनार आहे!)

माजी न्यायमूर्ती आणि मराठीतील प्रसिद्ध लेखक नरेन्द्र चपळगावकर यांचं त्यांच्या मुलीने रेखाटलेलं हे व्यक्तिचित्र…

माझ्या आई- बाबांना चार मुलं. आम्ही चौघंही स्वभावाने अगदी वेगळे आहोत. पण तरीही आम्हा मुलांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत. आम्ही माणसांमध्ये रमतो, आमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना काही अडचणी असतील, तर आम्ही त्या आमच्याच अडचणी आहेत, असं मानून चालतो (बऱ्याचदा फुकटचे सल्ले देतो!). आम्हाला कला, साहित्य, संगीत, सिनेमे इत्यादी गोष्टींमध्ये रस आहे, पण आम्ही कर्मकांड मानत नाही वगैरे वगैरे. त्यातल्या त्यात माझा भाऊ शांत आहे, आणि आपल्याच जगात गुंतलेला आहे, पण आम्हा तिघींचा पसारा मोठा आहे. या पसाऱ्याला जबाबदार आहेत आमचे आई -बाबा. त्यांनी कधी आम्हांला पांढरपेशा राहायला शिकवलंच नाही. उलट जगणं जितकं उत्कट (पॅशनेट) जगता येईल तितकं जगायचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. या उत्कट जगण्याला किनार आहे बाबांच्या उत्तुंगतेची!

वडील म्हटलं की, फार वेगळ्या कल्पना असतात. पण बाबा कधी सामान्य वडील नव्हते, ना नवरा, ना आजोबा. माझ्या जन्मापूर्वीचे राजकारणी बाबा, पत्रकार बाबा, नंतरचे वकील बाबा आणि मी शाळा-कॉलेजात असतानाचे न्यायाधीश बाबा आणि सध्याचे लेखक बाबा, या सगळ्या रूपांमध्ये त्यांचं करिअर बदलत राहिलं, तरी त्यांची प्रत्येक कारकिर्द अतिशय यशस्वी झाली. ती यशस्वी करण्यासाठी ते दिवस-रात्र झटत होते आणि त्याचबरोबर एक मोठा कुटुंबकबिला सांभाळत होते. या सगळ्या लटांबरात (हा खास माझ्या आईचा मराठवाडी शब्द!) मी एका कोपऱ्यात होते. तीन मुलींपैकी सगळ्यात धाकटी मुलगी. माझ्यापाठोपाठ एक भाऊ.  
बाबांचा जन्म आणि बालपण बीड या आमच्या गावी गेलं. ‘आठवणीतले दिवस’ या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या लहानपणी बीड कसं होतं, याचं फार सुंदर वर्णन आलं आहे. गाव छोटं होतं, टुमदार होतं. मोजकी घरं होती. सामाजिक, आर्थिक प्रश्न होते, पण आयुष्य गुंतागुंतीचं नव्हतं. गावात चपळगावकरांचा एक वाडा होता, ज्यात काही कुटुंबं एकत्र राहत. बाबा लहान होते, तेव्हा निजामाच्या अन्यायी राजवटीच्या विरोधातला संघर्ष निकरावर आला होता. त्यांचे वडील या लढाईत सामील होते. बऱ्याचदा आजोबा तुरुंगात असत. बाबांचा शाळेत प्रवेश झाला, तेव्हाही ते तुरुंगात होते. त्यामुळे त्यांची जन्मतारीख शिक्षकांनी अंदाजाने लावली. बाबांना शाळेत प्रवेश तर लवकर मिळाला, पण ते नोकरीतून जवळपास १५ महिने आधी निवृत्त झाले. ते त्यांच्या सख्ख्याचुलत भावंडांमध्ये सगळ्यात मोठे. त्यामुळे ते जन्माला आल्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला, असा उल्लेख त्यांच्याच ‘आठवणीतले दिवस’मध्ये आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजोबांनी राजकारणात प्रवेश केला, पण फार लवकर त्यांचा भ्रमनिरास झाला. इतका की त्यांनी पुढच्या आयुष्यात कधीच राजकारणात भाग घेतला नाही. आयुष्यभर वकिली केली आणि त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालयासारख्या संस्थांसाठी काम केलं. पुढे त्यांनी गावाबाहेर एक बंगला बांधला. मग आजोबांचं कुटुंब गावातल्या वाड्यातून बंगल्यात राहायला आलं. घर मोठं असावं, त्यात घरातल्या सगळ्या सदस्यांची सोय व्हावी आणि त्याचबरोबर घरी भेटायला, राहायला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था असावी, हा विचार आजोबांनी केला होता. बाबांनी पुढे स्वतःचं घर बांधलं, तेव्हा त्यांनीही हात आखडले नाहीत.
बाबांच्या लहानपणाबद्दल किंवा त्यांच्या भावविश्वाबद्दल फारशी माहिती मला नाही. म्हणजे वरवरची आहे. ते कुठे राहिले, त्या वेळी गावातली परिस्थिती कशी होती, वाड्यावर कोणकोणती कुटुंबं राहात होती. जुन्या चालीरिती कशा होत्या वगैरे. पण सतत वडील तुरुंगात असल्यामुळे ते लहान असताना त्यांना त्यांची आठवण यायची का, अतिशय श्रीमंत चुलत्यांच्या बाजूला अत्यंत हलाखीत दिवस काढत असताना त्यांना काय वाटत असेल, गरिबीमुळे त्यांना कधी अवहेलना सहन करावी लागली का, अशा प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ते शाळेत असताना काही दिवस अमरावतीला शिकायला होते. त्या काळात काय झालं याचे तपशील मला माहीत नाहीत. त्यांचं खासगी विश्व त्यांच्या सामाजिक विश्वात दडपलं गेलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांत मराठवाड्याचा सामाजिक इतिहास विस्ताराने आला आहे. निझामी राजवट, संस्थानातली माणसं आणि निझामकालीन सामाजिक जीवन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. मला नेहमीच कुतूहल वाटतं त्यांच्याबद्दल. पण थोड्या विस्कळीत आठवणी सोडल्या ,तर ते फार बोलत नाहीत. त्यांची आई आणि आजी त्यांचे खूप लाड करत. अगदी लहानपणी ते बऱ्याचदा रात्री रडत रडत उठत. त्यांच्या दिमतीसाठी दोघी जणी दहीदुधसायभात तयार ठेवत, असे माझी आई सांगते. दही, दूध, साय, भात या चार गोष्टी त्यांना अती प्रिय आहेत त्या तेव्हापासून! अजून एक गोष्ट आम्हाला माहीत आहे, ती म्हणजे ते लिहायला-वाचायला फार लहानपणी शिकले, अगदी शाळेत जायच्या आधीच; तेही सिनेमाचे पोस्टर लावून गावात फिरणाऱ्या गाडीवरील अक्षरं वाचता वाचता. पण हे काही उल्लेख सोडले, तर प्रथमपुरुषी एकवचनी लिहिण्याचा त्यांचा स्वभाव नाही.
बाबांबरोबर आम्ही सुरुवातीला आमच्या गावी, बीडला राहिलो, नंतर थोडा काळ मुंबईला आणि मग औरंगाबादला स्थायिक झालो. बीडच्या आठवणी फार थोड्या आहेत, कारण मी जेमतेम दोन-अडीच वर्षांची असताना आम्ही बीडमधून बाहेर पडलो. एक आठवण आहे. ती माझी पहिली आठवण. त्यात बाबा आहेत. मी जेमतेम चालायला लागली आहे. मला गोवर झालाय. तापाने मी फणफणली आहे. कदाचित त्या वेदनांमुळे ती आठवण टिकून राहिली आहे. त्या तापात बाबांनी मला कडेवर घेतलंय आणि ते घराला जोडून असलेल्या त्यांच्या कचेरीत मला घेऊन पंख्याखाली उभे आहेत. आतून आई काहीतरी बोलतीये, तिला ते सांगताहेत, ‘पंख्याखाली हिला जरा बरं वाटेल.’ माझं रडणं थांबलंय आता. ते त्यांच्या कचेरीच्या बाहेर येतात. बाहेर दाराच्या उजव्या बाजूला एक मोठं काटेरी, गावठी गुलाबाचं झाड आहे. त्या गुलाबाला एक टपोरं फूल फुललंय. बाबा मला ते फूल दाखवतात. माझ्या अडीच वर्षांच्या आयुष्यातली ती सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझे डोळे विस्फारलेले असावेत. माझ्या नजरेसमोर अजून तो टपोरा गुलाब आहे!
आईबाबांचं लग्न झालं, तेव्हा आई अवघी सोळा वर्षांची होती. बाबा वकील होते आणि सामाजिक कामांमध्येही गुंतलेले होते. वयातलं अंतर या गोष्टीला त्या काळी फार महत्त्व नव्हतं. एके काळी अतिशय श्रीमंत असलेल्या आईच्या माहेरी त्यांच्या लग्नाच्या वेळी गरिबी होती. आजोबांना गरिबी-श्रीमंती असे भेद मान्य नव्हते आणि त्यांनी त्या काळी एक रुपयाही हुंडा न घेता किंवा पत्रिका न बघता आईबाबांचं लग्न लावलं. इतकंच नाही, तर लग्नाला लागणारा खर्च मुलीच्या वडिलांना झेपणार नाही, असं लक्षात आल्यावर तो खर्चही त्यांनीच केला. आजी-आजोबा सश्रद्ध होते, पण कर्मकांड आणि अनावश्यक चालीरिती यांना त्यांनी सुरुवातीपासूनच सोडून दिलं होतं. या लग्नानंतर आजोबांना एक लहान मुलगी आपल्या घरी आली आहे, तिची काळजी घेतली पाहिजे, असं वाटायचं. त्यामुळे आई स्वयंपाकघरात गेली की, ते हळूच दाराबाहेर उभे राहून म्हणत, ‘बाळ, स्वयंपाक करताना पदर नीट खोच, नाहीतर तुला चटका बसेल’.
आजोबांच्या स्वभावातला हा हळुवारपणा बाबांमध्येही आहे. आता आम्हा तिन्ही बहिणींनी चाळिशी पार केली आहे, पण आजही ते माझ्याकडे आले की म्हणतात, ‘भक्ती तुला किती काम पडतं!’ रात्री उशिरा येऊनही सकाळी मुलांना तयार करून शाळेत पाठवून स्वतः ऑफिसला जाणारा माझा नवरा, ते असं काही बोलले की, माझ्याकडे थक्क होऊन बघतो!  
आईबाबांच्या लग्नानंतर काही वर्षांतच आईचे आईवडील वारले. काही घरं सोडली तर तिला माहेर असं उरलं नाही. बाबा, आजी-आजोबा आणि आम्ही, हे तिच्या जगाच्या केंद्रस्थानी होतो. पण असं असलं, तरी आई आधीपासून खूप स्वतंत्र वृत्तीची आहे. एखादी गोष्ट बाबा म्हणतात म्हणून ‘हो’ ला ‘हो’ करणाऱ्यातली नाही. एखादं मत पटलं नाही, तर लगेच मोकळेपणाने आपलं मत मांडण्याचा तिचा स्वभाव. त्याला बाबांनीही कधी आडकाठी आणली नाही. तिनेही बाबांच्या समाजकार्यात, सतत माणसांच्या घोळक्यात राहण्याच्या स्वभावाला आपलंसं केलं. तीही नेहमी माणसांमध्ये रमली. घरी सतत माणसांचा राबता, येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी सतत चहा करायचा, घरी जेवायला रोज किती जण असतील, याचा काही हिशेब नाही, या सगळ्या गोष्टी तिने सहज स्वीकारल्या.
अणीबाणी जाहीर झाली तेव्हा आईबाबा बीडलाच राहत होते. अणीबाणीच्या विरोधात गावोगावी सभा होत होत्या. त्या वेळी माझा जन्मही झाला नव्हता, पण सायली चार-साडेचार वर्षांची, तर मेघना काही महिन्यांची होती. अणीबाणीच्या विरोधात बीडमध्ये सभा, गुप्त बैठका होत होत्या. त्यासाठी राज्यभरातून एस. एम. जोशी, मृणाल गोरे, ग.प्र. प्रधान यांच्याबरोबरचे अनेक नेते बीडमध्ये येत. अटक टाळण्यासाठी त्यांच्या आगमनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाई. पदरी काही महिन्यांची लहान मुलगी असून आई पदर खोचून या सगळ्यांची खातरदारी करत असे.
अणीबाणी संपली, पुढे जनता पक्षाची हवा सुरू झाली. हा काळ बाबांसाठी फार निर्णायक होता. पुढे वकिली व्यवसाय करावा, की राजकारणात झोकून द्यावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. इतरांच्या कारभारात कधीही लक्ष न घालणाऱ्या किंवा स्वतःहून कधी सल्ला न देणाऱ्या माझ्या आजोबांनी आपल्या स्वभावाला मुरड घालून या वेळी त्यांना एक सल्ला दिला – ‘वकिली कर. राजकारण हे क्षेत्र तुझ्यासाठी नाही. राजकारणात तुझा निभाव लागणार नाही.’ आजोबांचा सल्ला बाबांनी मानला. पदरी चार मुलं आणि वयाची चाळिशी पार केली असताना त्यांनी हायकोर्टात वकिली करण्यासाठी मुंबई गाठली. बीडसारख्या शांत ठिकाणी राहिल्यानंतर आता ते मुंबईच्या गर्दीत सापडले. सुरुवातीला काही वर्षं ते एकटे राहिले, नंतर काही काळासाठी आम्ही मुंबईत आलो. मुंबईतल्या वास्तव्याचा फायदा त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नक्कीच झाला. पुढे उच्च न्यायालयाचं एक खंडपीठ औरंगाबादला आलं आणि बाबांनी लगोलग आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. आता ते मराठवाड्यातच आणि बीडच्या अगदी जवळ आले.
आम्ही ८०च्या दशकात औरंगाबादला आलो. इथे बाबांना त्यांची कर्मभूमी सापडली. अतिशय तल्लख बुद्धीची साथ असल्याने वकिली जोरात चालायला वेळ लागला नाही. हायकोर्टातल्या आघाडीच्या वकिलांमध्ये त्यांचं नाव होतं. त्या वेळी आम्ही भाड्याच्या घरात पहिल्या मजल्यावर राहत असू. त्यांची कचेरी सतत पक्षकारांनी भरलेली असे. त्यांच्याबरोबर एका वेळी डझनभर ज्युनियर वकील काम करत असत. काही काही वेळा कचेरीत एवढी गर्दी होई की, पक्षकार पायऱ्यांवर बसत आणि बाबांचे ज्युनियर्स त्यांच्याबरोबर पायऱ्यांवर बसून ब्रीफ लिहून घेत. या काळात केलेलं अर्थार्जन त्यांना बराच काळ पुरलं. त्यांनी एक घर बांधलं. आपल्या मोठ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम राहता आलं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न होता. मुलांसाठी वेगळ्या खोल्या, खोल्यांना लागून असलेल्या बाथरूम्स, बाथटब असलेलं एक भलंमोठं बाथरूम, गेस्ट रूम्स, प्रशस्त लायब्ररी, अशा गोष्टींनी युक्त असलेलं हे घर होतं. आपल्या कामात कितीही व्यग्र असले, तरी घर बांधताना त्यांनी प्रत्येकाचा किती विचार केला होता याची कल्पना येईल. औरंगाबादसारख्या मुंबई-पुण्याच्या तुलनेत लहान गावी असं घर लोकांसाठी अप्रूप होतं. कामानिमित्त मोठ्या गावात वावरणाऱ्या बाबांना उत्तम जगायला आवडतं आणि त्यांनी याच दृष्टीने घर डिझा
न केलं.
आम्ही नव्या घरात राहायला आलो आणि थोड्या काळानंतर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून बाबांची नियुक्ती झाली. खरंतर अपेक्षापेक्षा फार उशिरा ही नियुक्ती झाली होती, पण बाबा गमतीने म्हणत, ‘बरं झालं, उशीर झाला. या काळात मी वकिली करून जे पैसे मिळवले त्यात मला घर बांधता आलं. न्यायाधीशाच्या पगारात ते शक्य झालं नसतं.’ त्यांचं म्हणणं खोटं नव्हतं. इतके दिवस व्यवसायात मिळणारं उत्पन्न बंद झालं आणि काटकसरीचे दिवस सुरू झाले. राहायला मोठं घर, येणारे-जाणारे लोक, चार मुलं, म्हातारे आईवडील आणि नातेवाईक या सगळ्यांना सांभाळणं फार अवघड होतं. हा काळ पैशांच्या तंगीचा होता. बाबांचे एक मदतनीस होते. त्यांना नेहमी प्रश्न पडे, हा महिना कसा जाईल? पण बाबांनी खर्चासाठी आईला पैसे देणं जवळपास बंद केलं. त्यांच्यात वाद होऊ लागले. आई म्हणे, ‘भाजीवाला आलाय, मला पैसे द्या’, आणि ते म्हणत-‘मी घराबाहेर येतो आणि देतो.’ भाजीतून उरलेली किरकोळ चिल्लरसुद्धा आईच्या हातात जाऊ द्यायची त्यांची तयारी नसायची. शेवटी तंगीला कंटाळून तिने अनेक व्यवसाय केले. कधी साड्या विकल्या, कधी महिलांची अंतर्वस्त्रं. एकदा सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचा कारखाना सुरू केला घरी. शेवटी एका मैत्रिणीच्या साहाय्याने सुरू केलेलं पोळी भाजी केंद्र चांगलं चालायला लागलं आणि तिला घरखर्चाला हक्काचे पैसे मिळू लागले. या सगळ्या गोंधळात ‘युवर ऑनर’ मात्र शांतपणे आपलं काम करत होते. त्यांच्याकडे बघून यांच्या घरी इतकी हलाखीची परिस्थिती आहे, याची कल्पनाही कुणाला आली नसेल! आज मी हे उघड व्यक्त करतीये, हे त्यांना बिलकूल आवडणार नाही, पण हरकत नाही.
याच काळात मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. आईबाबांनी त्याला पाठिंबा दिला. पण तिथलं वास्तव्य सोपं नव्हतं. पैशांची चणचण असायची. बाहेर राहायचं म्हणजे खोलीचं भाडं, मेसचे पैसे द्यावे लागत. हायकोर्ट जजची मुलगी म्हणजे हिला काय अडचण असेल, असं सगळ्यांना वाटायचं. आतली परिस्थिती कुणाला माहीत नव्हती! त्या काळात एकदा आईने एक पत्र आणि काही पैसे माझ्या मित्रांकरवी पाठवले. त्यात लिहिलं होतं, ‘मेसचे पैसे पाठवतीये, पण पूर्ण महिन्याचे पैसे नाहीत, अर्ध्या महिन्याचे पैसे सध्या भर’. काही करून मुलीने बाहेरगावी शिकावं ही आईची तळमळ त्या वेळी मला समजली नाही. पत्र सील न केल्यामुळे आपली तंगी मित्रांना कळेल, या गोष्टीचा भयंकर राग मात्र आला.
पण पैसा हाच आयुष्याच्या केंद्रभागी नसतो, नसावा. उलट, आहे त्या परिस्थितीत नेकीने राहता आलं पाहिजे हा धडा बाबांनी आमच्यासमोर गिरवला. नव्या घरातल्या गाण्याच्या मैफिली, गप्पांचे फड, जेवणाच्या टेबलावर झालेल्या चर्चा, मित्र-मैत्रिणींबरोबर रात्र रात्र मारलेल्या गप्पा, तासन्‌तास लायब्ररीत बसून वाचलेली पुस्तकं, यांमुळे आयुष्य फार सुंदर झालं! बाबांच्या लायब्ररीत उत्तमोत्तम पुस्तकं होती आणि कुठलंही पुस्तक वाचायला त्यांनी कधी मनाई केली नाही. माझ्या मोठ्या बहिणीला कवितांचा नाद होता, तर मधल्या बहिणीला आणि धाकट्या भावाला चरित्र आणि कादंबऱ्यांचा! मी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असे. सहावीत असताना मी ‘शांतारामा’ हे व्ही. शांतारामांचं आत्मचरित्र वाचलं. भलं मोठं पुस्तक! त्यातले संदर्भ कळण्याचं माझं वयही नव्हतं. ते वाचत असताना बाबा तिथे आले. इतर कुणी असतं, तर हे कशाला वाचत आहेस, वगैरे म्हणाले असते, पण त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. त्यांच्याकडे कुणीतरी आलं होतं, त्यांनाही ‘माझी मुलगी बघा किती वाचते’ असं म्हणाले. ज्या साहित्यिकांचं साहित्य, कथा, कविता वाचून भारावून जात होतो, ते लेखक, कवी औरंगाबादला आले की, बाबा त्यांना आवर्जून घरी बोलावत. त्यांच्या कवितांच्या, वाचनाच्या मैफिली होत. या थोर लोकांची थोरवी कळण्याचं वय नव्हतं, पण आपण काहीतरी अद्‌भुत अनुभवतो आहोत असं नक्कीच वाटायचं.
बाबांच्या व्यासंगाला अतिशय बुद्धिमान आणि तल्लख मित्रांची साथ होती. कर्मयोगी पत्रकार अनंतराव भालेराव हे बाबांना वडिलांसमान, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीचं होतं. रोज संध्याकाळी त्यांच्या घरी होणाऱ्या गप्पाटप्पांत अनेक विद्वान, साहित्यिक सहभागी होत. आई त्याला गमतीने ‘चावडी’ म्हणे! संध्याकाळी बाबा अण्णा आजोबांकडे (अनंत भालेरावांना सगळे जण ‘अण्णा’ म्हणत.) निघाले की, आई म्हणे, ‘निघालात का चावडीवर!’ पण या चावडीवर सगळ्यांना मुक्त प्रवेश होता. अगदी आमच्यासारख्या लहान मुलांनादेखील! त्यांच्याबरोबर मी काही सहलींना गेल्याचं आठवतं. त्यांच्या गप्पा कळण्याचं ते वय नव्हतं, पण सगळ्यांना बरोबर ठेवण्याचा अण्णा आजोबांचा स्वभाव होता. त्यामुळे हास्यविनोदात आमचाही चिऊकाऊचा सहभाग असायचा. अण्णांचा आणि इतर मित्रांचा सहवास बाबांना फार काही देऊन गेला.
जेवण आणि खाद्यपदार्थ हा बाबांचा अतिशय आवडीचा विषय; आस्वादाचा आणि चर्चेचा! एखादी गोष्ट त्यांना क्वचितच आवडते. अगदी साधं वरणात गूळ कमी आहे आणि हिंग जास्त आहे, अशा प्रकारची टीका ते करतात. माझी आई अतिशय सुगरण आहे. पण तिला एखादा पदार्थ चांगला झाला आहे, अशी दाद बाबांकडून फार कमी वेळा मिळते. त्यांनी फार पूर्वी लग्नाच्या जेवणाचा मेन्यू काय असावा, या विषयावर एक लेख लिहिला होता. तो लेख फार गाजला. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी त्यांनी लग्न समारंभांत उत्तम, सुग्रास, सौम्य पण चविष्ट जेवण कसं असलं पाहिजे, याबद्दल स्वप्नरंजन केलं होतं. ज्या गोष्टीकडे आजही फारसं कुणी लक्ष देत नाही. जेवणावळींना आलेल्या पंजाबी रूपाचा त्यांना फार राग येतो. त्यांचं म्हणणं, ‘हे खरं चविष्ट पंजाबी जेवणही नाही, त्याचं भ्रष्ट रूप आहे.’ वातड रोट्या, तेलकट भाज्या, फडफडीत भात वगैरे समोर दिसलं की, त्यांच्या रागाचा पारा चढतो. आमच्याकडच्या समारंभांना जे जेवण दिलं जातं, त्याबद्दल इतका खोलवर विचार क्वचितच दुसऱ्या घरी होत असेल. आम्हा मुलींच्या लग्नात त्यांनी बीडहून आचारी आणले होते. याला दोन कारणं होती. माणसी पर प्लेटनुसार पैसे द्यायचे म्हणजे खर्च फार होणार, आणि दुसरं म्हणजे आचाऱ्याकडून आपण हवा त्या प्रकारचा स्वयंपाक करून घेऊ शकतो. शिवाय प्रत्येक लग्न समारंभाला सरासरी अडीच हजार लोक आले होते. माझी मोठी बहीण, सायली कधीकधी गमतीने म्हणते, ‘इतर ठिकाणी मुलीला काय द्यावं, जावयाला काय द्यावं, लग्नात किती दागिने करावे अशा चर्चा होतात. आपल्याकडे फक्त किती लोक जेवायला येतील आणि मेन्यू काय असावा एवढीच चर्चा होते!’
गेल्या वर्षी आईबाबांच्या लग्नाला पन्नास वर्षं पूर्ण झाली. त्याबद्दल आम्ही एक छोटासा समारंभ केला. त्यातही मेन्यू काय असावा याबद्दल बराच वेळ चर्चा झाली. शेवटी आम्ही पर्याय सुचवला, ‘जो मेन्यू तुमच्या लग्नात होता तोच ठेवू यात.’ बाबा म्हणाले, ‘अतिशय चविष्ट अळूची भाजी होती. प्रत्येक वाटीत ओल्या नारळाचे पातळ तुकडे आणि शिजलेले शेंगदाणे येतील असं प्रमाण साधलं होतं.’ यावर आईने ही भाजी नव्हतीच असं सुनावल्यावर बाबांना काही उत्तर देता आलं नाही. आता पन्नास वर्षांपूर्वी काय घडलं, हे आम्हाला समजणं शक्य नसल्याने तो विषय तेवढ्यावरच थांबला.
आईबाबांचं वैवाहिक आयुष्य मला आई करते त्या आंबटगोड वरणासारखं वाटतं; चविष्ट आणि खमंग! पण दोन्ही चवी इतक्या एकजीव झाल्या आहेत की, गूळ कुठे आणि चिंच कुठे हे कळायला मार्ग नाही. त्याचबरोबर तिखट, मीठ, हिंग, मसाल्याचं प्रमाण इतकं योग्य आहे की, प्रत्यक्ष बाबांनासुद्धा त्यात खोड काढता येणार नाही!
बाबांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणं मनापासून आवडतं, पण हा सहभाग तयारीनिशी असतो. अतिशय रसाळ आणि माहितीपूर्ण बोलणं हे त्यांच्या भाषणांचं वैशिष्ट्य! कित्येकदा ही भाषणं उत्स्फुर्तपणे केलेली असतात, तर अनेक वेळा ते पूर्ण तयारी करूनच भाषण करतात. पण कागद समोर ठेवून तो वाचणं त्यांना जमत नाही. जोपर्यंत ते मनापासून बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांचं भाषण रंगत नाही. मी शाळेत असताना त्यांच्या व्याख्यानांची चर्चा शाळेत होत असे, विशेषतः शाळेतल्या बाई एकमेकींना रंगवून रंगवून सांगत असत. मी नववीत असताना अचानक वक्तृत्व स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू मला त्यात रुची निर्माण झाली. बऱ्याच जणांना वाटे, हिचे बाबा हिला भाषणं लिहून देत असतील, पण उलट होतं. आपण कधी काही विचारायला जावं, तर त्यांनी म्हणावं, ‘लायब्ररीत जा, अमुकतमुक पुस्तक काढ. त्यात तुला चांगली माहिती मिळेल’. त्यामुळे स्वतः विचार करायची, त्यासाठी संदर्भ शोधायची सवय लागली. बऱ्याचदा त्यांना मी कोणत्या स्पर्धेत गेले होते, बक्षीस मिळालं आहे, याचा पत्ताही नसे. मी औरंगाबाद सोडल्यानंतर त्यांना एकदा माझी प्रमाणपत्रं सापडली. आपली मुलगी फार हुशार आहे, अशी मी शाळा सोडल्यानंतर दहाएक वर्षांनी त्यांना जाणीव झाली. आणि मग ती सगळी प्रमाणपत्रं व्यवस्थित एका फा
लला लावून त्यांनी मुंबईला माझ्याकडे पाठवून दिली!
अभ्यास सोडून इतर सर्व गोष्टी करण्याचा माझा स्वभाव असल्याने त्यांना कधीकधी माझी काळजी वाटे. माझी दहावीची परीक्षा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी त्यांनी मला लायब्ररीत बोलावलं. मुलांशी काहीही गंभीर बोलायचं असेल, तर लायब्ररीत बोलावलं जायचं! मी लायब्ररीत गेल्यानंतर बाबांनी लायब्ररीचा दरवाजा ओढून घ्यायला सांगितला. मला समोर बसवलं आणि अत्यंत करुण चेहऱ्याने मला त्यांनी विचारलं, ‘‘बाळा, उद्याच्या परीक्षेत पास होशील ना?’’ मी त्यांना काही आश्वासन देण्याऐवजी म्हणाले, ‘‘गणिताची खात्री नाही, बाकी विषयांत नक्की पास होईन.’’ यावर इतर पालक संतापले असते, पण बाबा म्हणाले, ‘‘पास होण्याचा प्रयत्न कर.’’ पुढे मला दहावीत बरे गुण मिळाले. माझी कीर्ती इतकी पसरली होती की, आजोबांनी सांगितलं, ‘आताच पेढे आणू नका, कित्येकदा पुढे किंवा मागे बसलेल्या विद्यार्थ्याचे गुण मध्ये बसलेल्या विद्यार्थ्याच्या नावाने छापले जाऊ शकतात. आधी गुणपत्रिका हाती येऊ द्या, मगच पेढे आणा.’ मी शाळेत कधीही अभ्यास, घरचा अभ्यास केला नाही. अतिशय वेंधळी म्हणून मी प्रसिद्ध होते (आहे). पण या गोष्टी आईबाबांनी नैसर्गिकपणे स्वीकारल्या. आता माझ्या मुलांत मी आणि माझा नवरा इतके गुंतलेले बघून कधीकधी बाबा म्हणतात, ‘‘आम्ही तुमच्याकडे कधी इतकं लक्ष दिलं नाही.’’ ते असं म्हणाले की मला वाटतं, ‘तुम्ही जे आम्हांला भरभरून दिलं, ते देत असताना तुम्हाला त्याची जाणीव नव्हती, ना आम्हांला जाणीव होती!’
त्यांच्या मुलांबद्दल त्यांच्या ठोस समजुती आहेत, त्या बदलायचा मी बऱ्याचदा प्रयत्न करते, पण त्या बदलल्या जात नाहीत. शाळेत असताना आम्ही कोणत्या
यत्तेत आहोत, याची साधारण कल्पना त्यांना असे, त्यापुढे नाही. कित्येकदा सांगावं लागे, मी आठवीत नाही, नववीत आहे वगैरे. पण याला अपवाद सायली. ती आमची सगळ्यात मोठी बहीण. अभ्यासाकडे, घरकामाकडे लक्ष देणारी आणि मोठा मित्रपरिवार असणारी सर्वगुणसंपन्न मुलगी. बाबांचं म्हणणं होतं, सायली खूप हुशार आहे, तिने चांगलं करिअर केलं पाहिजे. तिने कसं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे याकडे त्यांचं बारीक लक्ष असे. फार लहान वयात सायली घर सांभाळायला शिकली आणि आजही उत्तम प्रकारे घर सांभाळते आणि व्यवसाय करते. सायलीनं ज्या प्रकारे आपला ब्रँड विकसित केला त्याचा त्यांना अतिशय अभिमान आहे.
दुसरी मेघना स्वभावाने फार गरीब आहे असं त्यांचं मत (माझे आणि तिच्या नवऱ्याचं, सिद्धार्थचं मत मात्र वेगळं आहे!). मेघना वकील आहे, जिल्हा बालकल्याण समितीची सदस्य आहे. स्वतःचं घर उत्तम चालवते, पण तरीही आजही त्यांना काळजी असते – ती जेवली असेल का, तिला फार काम पडलं असेल का वगैरे. काही दिवसांपूर्वी बाबांना कामानिमित्त नाशिकला जायचं होतं. त्यांना सोबत व्हावी म्हणून तीही त्यांच्याबरोबर नाशिकला गेली. तिकडे संध्याकाळी ती त्यांना म्हणाली, ‘मी जरा चालून येते.’ त्यावर ते तिला म्हणाले, ‘काळजी घे, फार लांब जाऊ नको.’ पंचेचाळीस वर्षांच्या मेघनाला हसावं, की रागवावं हे कळेना!
माझे आणि बाबांचे संबंध फार गमतशीर आहेत, आणि काळानुसार बदलत आहेत. लहानपणी मी खूप एकटी एकटी राहायचे. स्वतःमध्ये रमायचे. बीडच्या घराच्या मागे मोठी बाग होती. त्या बागेत मी तासन्‌तास फिरत असे. माझ्या एकलकोंड्या स्वभावाला आळसाची साथ होती. कोणतीही गोष्ट फार तत्परतेने मी करत नसे, करत नाही. आम्ही मुलं आईबाबा एकत्र असलो, की बाबा एक अॅक्ट करत असत. त्याची थीम अशी होती की, घराला आग लागली आहे आणि सगळे जण पळापळ करत आहेत. या गोंधळात मी कशी वागेन? मग बाबा आळोखेपिळोखे देत आणि म्हणत, ‘आग होय, कुठे? इथपर्यंत आली आहे का? हो का?’ मग पुन्हा आळोखेपिळोखे देत आणि अजून काहीतरी बोलत. त्यांचा भक्ती अॅक्ट मुलांमध्ये हिट होता. कोर्टाचं काम सुरू असताना बाबांना वेळ फार कमी मिळे, पण सुट्यांचा वेळ आमच्यासाठी असे. मग अशा काही गमतीजमती होत.
बाबांना विनोदाची उत्तम जाण आहे. बाहेर गंभीर विषयांवर बोलणारे बाबा घरी मुलाबाळांमध्ये अतिशय मोकळे असतात. मुलांच्या नकला करत आम्हांला हसवणारे बाबा फक्त आम्हा चौघांतच नाही, तर आमच्या इतर भावंडांमध्येही, आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये लोकप्रिय होते. योगायोग असा की, काही वर्षांपूर्वी मी जिथे राहते त्या इमारतीला आग लागली. मी पहिल्या मजल्यावर राहते आणि आग अगदी बाजूला लागली. मला अंदाज आल्यावर तीन मिनिटांच्या आत दोन्ही मुलं, घराची किल्ली, गाडीची किल्ली, पर्स आणि पाण्याची बाटली घेऊन घराबाहेर पडले. आम्ही सुखरूप बाहेर पडलो, पण इतर अनेक जण अडकले. नंतर घरी राहण्यासारखी परिस्थिती नसल्याने आठवडाभर औरंगाबादला राहिले. त्या वेळी बाबांचा अॅक्ट आठवून आठवून हसले!
त्यांच्या सायलीप्रेमाचा मात्र मेघनाला फार वैताग यायचा. मेघना सायलीपेक्षा चार वर्षांनी लहान, तिला पण सगळ्या गोष्टींत मत व्यक्त करायचं असायचं, पण बाबांचं लक्ष सायलीकडेच. मग मेघना चिडायची. गंमत म्हणजे नंतर एक काळ असा आला की, मी मजेत आहे, माझी काळजी कमी करत जा, असं म्हणायची वेळ मेघनावर आली. मी सुरुवातीला बाबांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे बाबांकडे कुणी महत्त्वाचे पाहुणे आले की, त्यांच्याशी सायलीशी ओळख करून देणं बाबांना आवडायचं. मग अशा वेळी मी मुद्दामून तिथे जाऊन बसे. मला वाटे, आता त्यांनी माझी ओळख करून द्यावी, नंतर द्यावी. कधीकधी ती व्हायची. कधी मी खट्टू व्हायचे. पण मला कधी न्यूनगंड आला नाही. माझी आणि सायलीची लहानपणापासून खूप गट्टी होती. मी तिचं अगदी शेपूट होते. तिच्या आणि माझ्या वयात सहा वर्षांचं अंतर आहे. तिने लहानपणापासून माझी खूप काळजी घेतली होती. शिवाय आईला माझं कौतुक. तिचा धोशा एकच, काहीतरी वेगळं करिअर कर. मी काहीही करायचं म्हटलं, तरी त्याला आईबाबांनी कधी विरोध केला नाही. अर्थातच बाहेरच्या जगाशी झालेली ओळख त्यांच्याच चश्म्यातून झाली असल्याने त्यांच्या आवडीच्या गोष्टीच मी केल्या. त्यामुळे विरोधाचा प्रश्न आला नाही. कधी कधी वाद व्हायचे, पण किरकोळ.
बाबांनी एखादा सल्ला दिला की, मी सरळ सरळ ‘हो’ म्हणत नाही, उलट त्याविरुद्ध काहीतरी करते असं बऱ्याचदा होतं. बाबाही त्याकडे दुर्लक्ष करतात. मी म्हणते, ‘‘दोष तुमचा आहे. तुमच्या समाजवादी पक्षाचं नुकसान झालं, कारण पक्षात सर्व जण नेते होते, कार्यकर्ते कुणीच नाही. तसंच आपल्या घराचं झालं आहे. प्रत्येक जण नेता आहे, दुसऱ्याचं ऐकत नाही. स्वतःची मतं ठासून बोलतो आणि त्यानुसार वागतो. इतकंच नाही, तर आपल्या घरातल्या व्यक्तीबद्दल उघडपणे चारचौघांत नाराजी व्यक्त करतो. आपल्या माणसांचं ऐकण्याऐवजी बाहेरच्या माणसाचं ऐकतो. मग मी तुमचं ऐकत नाही, यात चुकीचं काय आहे?’’
मी वरवर असं म्हणाले, तरी बाबांच्या मताला माझ्यालेखी सर्वोच्च स्थान आहे. मी कॉलेजमध्ये असताना मराठवाडा वर्तमानपत्रात काम करत असे. एकदा मला वरिष्ठांनी एका पुस्तकाचं परीक्षण करायला सांगितलं. माझ्या मते ते पुस्तक वाईट होतं. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याचं परीक्षण केलं आणि मोठ्या उत्साहाने बाबांना दाखवलं. त्यांनी त्याच्यावर एक नजर टाकली आणि मला सांगितलं, ‘‘तुला परीक्षण लिहिता येत नाही.’’ माझं लिखाण वाईटच असणार, पण त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मी निराश झाले. आपल्याला लिहिता येत नाही, असा विचार करत मी माझा लेख केरात टाकला. इतकंच नाही, तर माझं कोणतंही लिखाण फार उत्साहाने कधी त्यांना दाखवलं नाही.
या घटनेला बरीच वर्षं झाली. मुलांना घेऊन आम्ही कर्नाटकातल्या काबिनी इथं एका कौटुंबिक सहलीला गेलो होतो. त्या वेळी तिथे बाबांचा फोन आला. ऐकू येत नव्हतं म्हणून मी माझ्या कॉटेजच्या बाहेर आले. माझा एक लेख त्यांना कोणीतरी वाचायला दिला होता. तो लेख वाचून त्यांनी फोन केला होता. लेख फार उत्तम होता असं नाही, पण त्यांना तो फार आवडला होता. ते म्हणाले, ‘‘इतकी वर्षं तू मला घरातलं चैतन्य वाटायचीस. सगळ्यांना हसवणारी, गप्पा मारणारी विनोदी मुलगी. पण तुझी बुद्धिमत्ता मला कळाली नाही याचं वाईट वाटतंय.’’ अनपेक्षितरीत्या बाबांनी मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दाद दिली होती.
माझ्या तथाकथित बुद्धिमत्तेबद्दल त्यांनी बोलणं म्हणजे कौतुकाचाच भाग आहे, याची जाणीव मला होती, पण तरीही… मी त्या दिवशी त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारी पाचवीतली मुलगी झाले होते! बाबांच्या एका वाक्याने माझी कॉलर टा
ट झाली होती. काबिनीच्या जंगलातल्या आमच्या कॉटेजला लागून एक छोटी बाग आणि स्विमिंग पूल होता. त्या चांदण्या रात्री मी तिथे चकरा मारत मारत, रातकिड्यांची किरकिर ऐकत बाबांशी बोलत होते. तिकडे त्यांच्या डोळ्यांत आणि इकडे माझ्या डोळ्यांत पाणी ओथंबून आलं होतं! 
आईवडिलांनी मुलांचं कौतुक करणं यात आज काही विशेष वाटत नाही. मुलांनी कागदाचा बोळा कचऱ्यात टाकला तरी आज आम्ही ते करतो, पण आमच्या आईबाबांनी केलेलं कौतुक आमच्यासाठी विशेष आहे. नाहीतर वादविवाद हीच आमच्या घराची स्वभावप्रकृती आहे. बहुधा हे सगळे वाद खेळीमेळीने होतात. कुटुंबातली जी व्यक्ती या चर्चांना उपस्थित नसते, तिच्या वागण्याबोलण्यातल्या अनंत चुका हजर व्यक्ती बोलून दाखवतात. (मी म्हणते, ‘जजसाहेबांच्या घरातले लोक फारच ‘जजमेंटल’ आहेत!’) पण विरोध असला तर तो फक्त बोलून दाखवायचा, प्रत्यक्ष विरोध करायचा नाही, हीच पद्धत आहे. स्वतःचं मत मुक्तपणे मांडायची पद्धत इतक्या टोकाला गेली आहे की, जी भीती पितृसत्ताक कुटुंबात पित्याबद्दल असते, ती आमच्या घरात अजिबात नाही. प्रत्येक जण अगदी मुक्तपणे तुम्ही कसं चुकतात हे त्यांनाच सांगत असतो. ते हळूच त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, पण ती ऐकली जात नाही. मग ते स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडत नाहीत आणि स्वतःला हवा तो निर्णय घेतात.
आम्हा चौघांपैकी प्रत्येक जण लहानपणापासूनच स्वतःच्या मर्जीने राहत आला आहे. अगदी घट्ट विणलेलं कुटुंब असं आमच्या घराबद्दल म्हणता येणार नाही. त्यात आम्ही शिकत असताना घरी आमच्याबरोबर अनेक जण राहत होते. त्यामुळे काही वर्षं, विशेषतः बाबा जज झाल्यानंतर अशी गेली, ज्या वेळी आम्हांला कधी आईबाबा एक्सक्लुजिव मिळाले नाहीत. आज आमच्या वागण्यांत याचं नकळत प्रतिबिंब पडत असणार. पण आईबाबा ते जाणवू देत नाहीत. कधीकधी आमचा सूर उद्धटपणाच्या जवळ जाणारा असतो. पण आईबाबा शांत असतात, उलट शक्य तितकं आमच्या कलाने घेतात. तटस्थपणे विचार केला तर वाटतं की, जसे डबे भरून द्यायला आई नव्हती किंवा शाळेत सोडायला बाबा नव्हते, तसे आपणही कधी आईबाबांना चहा करून दिलाय, पाण्याचा पेला आणलाय असं झालं नाही. म्हणजे कुटुंब सार्वजनिक झाल्याचा तोटा आपल्यालाच नाही झाला, त्यांनाही झाला. असामान्य कारकिर्द असणारे बाबालोक कधी सामान्य बाबालोक नसतात, याची जाणीव आता झाली आहे.
बाबांचं मोठेपण दर दिवशी अधिकाधिक जाणवतं. त्यांचा व्यासंग, त्यांची सामाजिक प्रश्नांबद्दलची आस्था, त्यांचा उदारमतवाद भारून टाकतो. एके काळी त्यांना समाजवाद आपला वाटे. पण आज ते राजकीय पक्षांच्या फार पुढे गेले आहेत. जी गोष्ट समाजासाठी हितकारक आहे, जी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसून कल्याणकारी आहे, त्या गोष्टीला ते पाठिंबा देतात. सतत काम करत राहणं, सतत पुस्तकांचं लिखाण त्यांच्या आयुष्यांच्या केंद्रभागी आहे. आपल्या पुस्तकांतूनही ते महाराष्ट्राच्या उदारमतवादी सामाजिक परंपरेची नोंद घेतात. वेळोवेळी आपली मतं ते सामाजिक व्यासपीठांवरून निर्भीड स्वरूपात मांडतात. अनेकदा त्याला माध्यमं राजकीय रंग देतात. ते त्यांना आवडत नाही. राजकारण किंवा राजकारणी हा त्यांचा प्रांत नाही. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या तराजूत तोलणं त्यांना आवडत नाही. त्यांच्या लिखाणामागे एक व्यापक भूमिका असते. ती माध्यमांनी समजून घ्यावी, अशी त्यांची इच्छा असते.
मी त्यांना हळूच सांगायचा प्रयत्न करते की, समाजाला जागृत करण्याची आता माध्यमांची भूमिका राहिलेली नाही, आता फक्त मनोरंजन हाच माध्यमांचा उद्देश आहे. ते त्यांना मान्य नाही. आजही ते वर्तमानपत्रांना समाजाच्या केंद्रस्थानी मानतात. पुस्तकांच्या गराड्यात उभं राहून वाचन, मनन, चिंतन करणारे बाबा एखाद्या योग्यासारखे भासतात! तेव्हा त्यांच्या इतकं जवळ असून आपण किती सामान्य राहिलो याची जाणीव होते!
आज वयाची ऐंशी वर्षं पार केल्यानंतरही ते निवृत्त झाले नाहीत. ते त्यांच्या, तर आई तिच्या कामात व्यग्र असते. त्यांचा दिनक्रम काटेकोर आहे. आणि त्यामुळेच ते अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकतात. रोज सकाळी दोन तास त्यांचे टंकलेखनिक सुरेश पाटील आमच्याकडे येतात. त्या वेळी  संदर्भ ग्रंथ, नोंदी वगैरे बाबांनी तयार ठेवलेले असतात आणि पुढचे दोन तास बाबा काम करतात. या वेळी कोणताही व्यत्यय त्यांना चालत नाही. आमचा फोन आला, तर एकतर आईकडे दिला जातो किंवा थोड्या वेळाने फोन करतो असं सांगण्यात येतं. मग त्यांचे मदतनीस देशमानेकाका त्यांना वेगवेगळ्या विषयांबद्दल अपडेट देतात. बाबा त्यांना अनेक सूचना देतात आणि मग ते तासाभरासाठी घराबाहेर पडतात. संध्याकाळी ते त्यांचे परमप्रिय मित्र, सुधीर रसाळ (बापूकाका) यांच्याकडे जातात. बापूकाका आणि बाबा यांचे स्वभाव ज्याला इंग्रजीत ‘चॉक अँड चीझ’ म्हणता येईल इतके वेगळे आहेत. पण दररोज त्यांना एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. बहुधा बाबा बापूकाकांच्या घरी जातात. कधीकधी काका आमच्या घरी येतात. ‘आहेत का नानासाहेब?’ अशी बापूकाकांची आरोळी ऐकली की, आम्हीही गप्पा मारायला दिवाणखान्यात येतो. या दोघांमधील चर्चा ऐकणं आम्हा मुलांसाठी पर्वणी असते! त्यांच्यातल्या चर्चा अतिशय माहितीपूर्ण असतात. कविता, कथा, कादंबऱ्या, समीक्षा अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांचं रसग्रहण जेव्हा दोघं करतात, तेव्हा मी भारावून जाते. हे दोन विद्वान एकमेकांची रेवडी पण उडवतात, पण तीही इतक्या नजाकतीने की, जणूकाही लखनौच्या नवाबांनीच यांना ट्रेनिंग दिलं आहे! एकदा त्यांच्याशी बोलता बोलता मी विचारलं, ‘‘तुमची मैत्री होऊन किती वर्षं झाली?’’ तर ते त्यांच्या मैत्रीचं साठावं वर्ष होतं. यावरून मला कल्पना सुचली की, त्यांच्या ‘मैत्रीची साठी’ साजरी का करू नये! मग आम्ही एक छोटा कार्यक्रम केला, ‘मैत्रीची साठी’. त्यात बाबा आणि बापूकाकांनी ज्या गप्पा मारल्या त्यात मराठवाड्याचाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यविषयक घटनांचा आलेख उभा राहिला.
बाबा सगळ्यांचे बाबा आहेत. आमच्या घरी काम करणारी रचना, भाग्यश्री, मामी (ज्यांचं वय बाबांपेक्षा पाचेक वर्षांनी कमी असेल), भाग्यश्री मावशींचा नातू करण, ड्रायव्हर अनंत… सगळ्यांसाठी ते बाबा आहेत. सगळ्यांना ते आपले वाटतात आणि आपलेपणाच्या अधिकाराने ही मंडळी बाबांची काळजी घेतात. आमच्या घरी एके काळी कामाच्या शोधात मंडळी येत असत आणि नोकरी लागेपर्यंत घरी राहत, काम करत. त्यांपैकी मुशीर भाई म्हणून एक होते, त्यांना कोर्टात नोकरी लागली. एकदा ते घरी आले आणि त्यांच्या मते घराला रंगकाम करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी लगोलग बाजारात जाऊन रंग आणला आणि घराला रंग दिला. आम्ही सुटीत घरी आलो, तर संपूर्ण घर जांभळ्या रंगाचं झालं होतं. पण बाबांना अशा गोष्टी मान्य असतात.
आम्ही चौघं जण घराबाहेर पडलो असलो, तरी या त्यांच्या मुलाबाळांमुळे त्यांना ‘एम्टी नेस्ट सिंड्रोम’ आला नाही. बाबांसारखंच आमचं औरंगाबादचं घर, हवी तेव्हा थंडगार आणि हवी तेव्हा उबदार सावली देणाऱ्या वृक्षासारखं झालं आहे. वर्षाकाठी दीड-दोन दिवसांसाठी मी त्या सावलीत राहायला जाते. बाबा सारखं विचारतात, अजून का राहात नाहीस, पण माझ्या मागे असंख्य (अनावश्यक) कटकटी असतात. त्या मला दोन दिवसांपेक्षा जास्त काळ तिथे राहू देत नाहीत. माझा जाण्याचा दिवस उजाडतो. मला निरोप द्यायला आईबाबा सकाळी सकाळी घराबाहेर येतात. आई थोडी मागे उभी राहते. बाबा दोन पावलं पुढे येऊन उभे राहतात. मी ते दृश्य डोळाभर साठवते. मुंबईतल्या माझ्या गोंधळात ते दृश्य मला सोबत करतं. रोज सकाळी आईचा फोन येतो. बाबांचा फोन कधीतरी येतो. आता मी चाळिशी पार केली आहे आणि बाबांनी वयाची ऐंशी वर्षं पार केली आहेत. पण त्यांचा आवाज ऐकला की, मी पुन्हा अडीच वर्षांची मुलगी होते. गोवरातल्या फणफणलेल्या अंगाला पंख्याचा वारा लागावा इतका त्यांचा आवाज मुलायम असतो आणि माझ्या सगळ्या anxieties अचानक दूर होतात. दिवसभरात झालेल्या गमतीजमती आम्ही एकमेकांना सांगू लागतो. चाळीस वर्षांपूर्वी बीडच्या घराच्या दारासमोर उमललेला तो गुलाबी गुलाब मला समोर दिसतो. माझं जगणं सुगंधित होतं!  

मेघना चपळगावकर (मोठा… तरीही साधा माणूस)

कोणालाही नाव सांगितलं की, पहिली प्रतिक्रिया असते – ‘‘तुम्ही नरेन्द्र चपळगावकरांच्या कोण?” इतकं वलय आहे बाबांच्या नावाला! यात त्यांच्या व्यासंगाबरोबरच लोकसंग्रहाचा मोठा भाग आहे. पण त्यांच्या या वलयाचा फायदा घ्यायची आमची हिंमत नव्हती आणि नाही, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाबा.
बाबांना काय आवडणार नाही याची जाणीव बाबांच्या वागण्यातून फार लहानपणापासून आमच्या मनावर बिंबली आहे. त्यांनी त्यांच्या स्थानाचा कधीही फायदा घेतलेला आम्ही पाहिला नाही. अगदी आम्हालाही ते कोणत्याही बाबतीत गृहीत धरत नाहीत. बाबांना आमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं माणूस म्हणून मोठं असणं.
सगळ्यांसाठी विद्वान आणि व्यासंगी असणारे बाबा आमच्यासाठी फक्त बाबाच असतात. ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते तेव्हाही घरात ते फक्त बाबा असत.
आजीची आणि आजोबांची शेवटपर्यंत सेवा करणाऱ्या बाबांनी तेवढ्याच प्रेमाने सासू-सासऱ्यांची (आईच्या आईबाबांची) सेवा केली. आपल्या बायकोचे आईवडील लवकर गेले असल्याने तिला माहेर नाही, याची जाणीव त्यांनी आयुष्यभर ठेवली. आईला बाबांनी कधीही अपशब्द वापरले नाहीत. अगदी जोरात बोललेलंही आम्हाला आठवत नाही. आम्हालाही त्यांचं रागावणं सौम्य असतं. पण आपण वागलेलं बाबांना आवडणार नाही, याचा आम्हाला धाक आहे.
त्यांना आम्ही साडी नेसलेली आवडते. पण आम्ही साडी नेसावी असा त्यांचा आग्रह नसतो. म्हणजे मी जीन्स-टॉप घालून त्यांच्याकडे गेले, तर ते मला काही बोलणार नाहीत. पण सणाच्या दिवशी मी साडी नेसून गेले, तर ते खूश होतात, छान दिसतेस म्हणतात. पण हे एवढंच.

ते व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल जागरूक आहेत. त्यामुळे मला ‘साडी नेसत जा’ असं चुकूनही सांगणार नाहीत. आम्ही काय शिकावं, कोणते कपडे घालावेत, कोणती पुस्तकं वाचावीत याचं पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला फार लहानपणापासून होतं.
आम्ही लहान असताना आमचं काही चुकलं, तर आम्हाला घरच्या लायब्ररीमध्ये बोलावलं जायचं आणि एकांतात आमची शाळा व्हायची. बाबा कधीही लोकांसमोर रागवायचे किंवा अपमान करायचे नाहीत.
एखादी गोष्ट (गॉसिप) बाहेरून कळली आणि आम्ही त्यांना विचारलं, तर ते त्यावर बोलत नाहीत. आम्ही हसून त्यांना म्हणालो की, ‘‘सगळ्यांना माहीत आहे…” त्यावर ते म्हणतात, ‘‘असेल बुवा, मला काही कल्पना नाही.”
बाबा खूप हळवे आहेत. मी दहावीत होते, शाळेची ट्रिप कन्याकुमारीला चालली होती. माझे पैसे भरले होते, पण बाबांनी मला ट्रिपला जायचं नाही असं सांगितलं. माझी रडारड सुरू झाली, तेव्हा त्यांनी शांतपणे सांगितलं की, ‘तुझे पाय खूप फुटले आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून मी तुला पाठवणार नाही.’ पुढचे १५ दिवस ते स्वतः माझे पाय गरम पाण्यात भिजवून औषध लावत होते.
त्यांच्या हळवेपणाचा आणखी एक प्रसंग म्हणजे कोविडमध्ये त्यांचे ज्युनियर ॲड. हरिभाऊ मुंडे गेले. आईचा मला फोन आला की, ‘मला कळत नाहीये मी त्यांना कसं सावरू.’ मी त्यांच्याकडे गेले, तेव्हा बाबा सुन्न होऊन बसले होते. मुंडेकाकांवर त्यांचं पुत्रवत प्रेम होतं. त्यांना अतिशय दुःख झालं होतं आणि कोविडमुळे ते लताकाकूला भेटायला जाऊ शकत नाही, याचा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. माझ्या एवढ्या खंबीर वडिलांना असं बघून मला रडू आवरेना.
त्यांच्या या हळव्या स्वभावामागचं त्यांचं खंबीर मनही आमचा फार मोठा आधार आहे. माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना बाबा म्हणाले होते, ‘‘बाळ, आज तू राहायला त्या घरात गेलीस, तरी तुझं हे घर तुझंच आहे. कोणत्याही प्रसंगी गरज पडली, तर निर्धास्तपणे ये.” हा विश्र्वास मला अनेक अडचणींच्या प्रसंगी खंबीर करत राहिला.
आता आम्ही सगळे आमच्या संसारात रमलो आहोत. पण आमच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. आमची तब्येत, आमची कामं, आमची मुलं सगळं नीट आहे ना! रोज एखादा फोन करून आमची चौकशी होते ती मात्र आईकडून. आई त्या मानाने खंबीर आहे. अतिशय हळव्या बाबांना ती खंबीरपणे आणि शांतपणे साथ देत असते.
बाबांनी अनेकांना मदत केली. अनेक संस्था उभ्या करण्यात आणि चालवण्यात भाग घेतला, प्रसंगी पदरमोड केली. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. अशा संस्था समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असल्याचं त्यांचं मत असल्याने त्यांनी केलेली मदत ते विसरूनही जातात.
२-४ वर्षांपूर्वी बाबा संध्याकाळी घरात वाचत बसले होते, तेव्हा एक पोलीस ऑफिसर आले. त्यांनी सांगितलं की, ते लहानपणी आमच्या घरात आउट हाउसमध्ये राहत असत. बाबांकडे येणारे पोलीस बघून त्यांना पोलीस ऑफिसर व्हावं असं वाटलं आणि बाबांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केली. अर्थात, बाबा हे सगळं विसरले होते.
बाबा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा साहजिकच आम्हाला खूप आनंद झाला. बाबांच्या लेखनात मोलाचा हातभार लावणारे त्यांचे लेखनिक सुरेश पाटील मला म्हणाले, ‘‘माझं भाग्य आहे की, मी त्यांचं काम करतो.” तेव्हा बाबांची प्रतिक्रिया होती, ‘‘अगं, तो उत्तम काम करतो आणि त्यांच्यामुळे मी एवढं लिहू शकलो.” ते स्वतःबद्दल ऐकून भारावले नाहीत किंवा आत्मस्तुतिपर काही बोलले नाहीत.
बाबांना सगळं व्यवस्थित लागतं… त्यांची पुस्तकं, लिखणाचं साहित्य आणि कपडेसुद्धा. त्यांचा कप्पा कधीही अव्यवस्थित नसतो. त्यांच्या या शिस्तीचा उपयोग त्यांना लिखाणात झाला. एखाद्या विषयावर वर्षानुवर्षं भरपूर आणि शिस्तीत संशोधन करणं, त्यासाठी योग्य ते संदर्भ ग्रंथ मिळवणं, भरपूर प्रवास करून लोकांना भेटणं, त्यांच्या मुलाखती घेणं यांमुळे त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण आणि समतोल होतं. अनेक वर्षं एखाद्या विषयात शिस्तीत अभ्यास केल्याने त्यांना त्या काळात दुसरं काही सुचत नसे. आम्ही याची थट्टा केली, तरी ते हसून पुन्हा पुस्तकाकडे वळत.
त्यांना उत्तम सौंदर्यदृष्टी आहे, याची जाणीव आमच्या घरात गेलं की होते. सागवानी सुतारकाम स्वतःच्या देखरेखीखाली करून घेणं असो, की एखादी फुलांची कुंडी आपल्या अभ्यासिकेत ठेवणं असो… ते कोणावर अवलंबून राहत नाहीत. त्यांना सगळे नेटकं हवं असतं. कपडे असोत की कागद, ते उत्तमच आणणार. त्यासाठी ठरावीक दुकानात जाणार. कोणाला काही द्यायचं असेल, ते त्यासाठी वेळ देणार, लक्ष देऊन उत्तम वस्तू आणणार. द्यायचं म्हणून उगाच काहीतरी दिलेलं त्यांना आवडत नाही.
आम्ही लहान असताना, घरी काम करणाऱ्या सर्व माणसांचा योग्य मान ठेवला पाहिजे याकडे त्यांचं विशेष लक्ष असे. सर्व नोकरांना आम्ही काका किंवा मावशी म्हणत असू. एकेरी बोलवायचं नाही. पाणी मागायचं असेल, तरी पाणी देता का? असंच मागायचं. घरी काम करणाऱ्या व्यक्तीला गरज पडल्यास आपण आर्थिक मदत केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असे आणि ती मदत केली जात असे.
आम्ही बाबांना सतत कामातच पाहिलंय. आम्ही झोपेतून उठल्यावर बाबा ऑफिसमध्ये दिसत आणि आम्ही झोपतानासुद्धा ते ऑफिसमध्येच असत. अगदी जेवण करतानाही बाबा डिक्टेशन देत असत. त्या काळच्या मोजक्या प्रथितयश वकिलांमध्ये त्यांची गणना होत असे. बाबांना आम्ही कधीही आरामात पाहिलं नाही. अपवाद फक्त आम्ही प्रवासाला जायचो, तेव्हाचा. बाबांकडे बहुतेक सगळं ओरिजनल साइड आणि सिव्हिल काम असायचं. माझ्या वकील भावाने वकिली सुरू केली, तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं, ‘कधीही फी सांगू नको, योग्य ती फी लोक स्वतःहोऊन देतात.’ आणि हा नियम त्यांनीही पाळला. त्यांनी कधीही डॉक्टर आणि शिक्षक यांच्याकडून फी घेतली नाही. नातेवाइकांकडून आणि परिचितांकडूनही नाही, गरिबांकडूनही नाही. अनेकांची कामं त्यांनी विनामोबदला केली, त्याचा कधीही उल्लेख केला नाही.
गंमत म्हणजे प्रकरणात काही मेरिट नसेल, ते पक्षकाराला सल्ला द्यायचे – ‘प्रकरण दाखल करू नका, यात काही होणार नाही.’ त्यांनी पैशासाठी कधीही कोणाला चुकीचा सल्ला दिला नाही. याउलट प्रकरण चांगलं असेल आणि पक्षकाराची फी देण्याची ऐपत नसेल, तर अनेक वेळा त्यांनी स्वखर्चाने प्रकरणं चालवली.
वकील असताना फक्त कायद्याच्याच नाही, तर महत्त्वाच्या अनेक कौटुंबिक बाबींमध्येही लोक त्यांचा सल्ला घ्यायला येत असत. आपल्याच कुटुंबातील एखादी वडीलधारी व्यक्ती असल्याने, गुप्तता राखली जाईल याची सल्ला मागणाऱ्या व्यक्तीला खात्री असे, आज त्यांचा लोकसंग्रह बघून लक्षात येतं की लोक किती विश्वासाने त्यांच्याकडे येत असत.
माझे आजोबा स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षं तुरुंगात होते, त्यामुळे की काय; बाबांच्या जागरूक स्वातंत्र्याच्या कल्पना फार स्पष्ट आणि आग्रही आहेत.
बाबांचं पहिलं पुस्तक ‘अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा’ प्रकाशित झालं. याआधी त्यांनी ललित स्वरूपाचं लेखन केलं होतं. ‘Law of Elections in India’ या पुस्तकानंतर त्यांनी कायदेविषयक पुस्तकं फारशी लिहिली नाहीत. अपवाद आहे तो ‘माहितीचा अधिकार’ या पुस्तकाचा. अर्थात ते कामात अतियश व्यग्र असत, त्यामुळे सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी फारसं लिखाण केलं नाही. निवृत्तीनंतर मात्र ते त्यांच्या आवडत्या अनेक विषयांवर लिहू शकले. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र हा त्यांचा आवडता विषय आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि आताच प्रकाशित झालेलं ‘पंतप्रधान नेहरू’ अशा संशोधनात गुंतलेले असले की त्यांना जेवणखाण काही सुचत नाही.
एखाद्या न्यायमूर्तींच्या कामाचा त्यांच्या वैचारिक आयुष्यावर काय परिणाम होतो, तो सर्वसामान्यांच्या फारसं लक्षात येत नाही. बाबा न्यायमूर्ती होते, तेव्हा एकदा अचानक ते आमच्यावर बंधनं घालायला लागले, ‘कुठे चाललीस ? उशीर का झाला? कोणाबरोबर चाललीस?’ असे प्रश्न विचारणारे बाबा आम्हाला नवीनच होते. आम्ही आईकडे याची तक्रार केली, तेव्हा तिने सांगितलं की बाबा तेव्हा क्रिमिनल कोर्टाचं काम करत होते आणि एक अतिशय दुःखद प्रकरण त्यांच्यासमोर सुरू होतं, ज्यात एका तरुण मुलीच्या मित्राने तिला जाळून मारलं होतं. सामान्य लोकांना याची जाणीव नसते की, न्यायमूर्तींमध्येसुद्धा एक प्रेमळ बाप असतो. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्या प्रकरणात स्वतःच्या भावनांना दूर ठेवून निर्णय दिला.
बाबांचा आणखी एक मोठा निर्णय जो पुढे रिपोर्ट झाला (महत्त्वाचे निकाल पुढील संदर्भसाठी ‘AIR’ सारख्या नियतकालिकात छापून येतात, त्यामुळे त्या पद्धतीच्या पुढील खटल्यात त्या निकालाची मदत होऊ शकते.), तो म्हणजे खून प्रकरणात एका व्यक्तीने एका १५ वर्षीय मुस्लीम मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केलं. आरोपीच्या वकिलांनी असा बचाव केला की, एकदा puberty आल्यावर मुस्लीम मुलगी लग्न करू शकते, तेव्हा ‘वडिलांच्या कायदेशीर ताब्यातून विनापरवानगी काढून नेणं हा गुन्हा आहे, त्याच्याशी मुस्लिम कायद्याचा काहीही संबंध नाही’ असा बाबांनी निकाल दिला. हा निर्णय इतका महत्त्वाचा समजला जातो की, टाइम्स ऑफ इंडियाने त्यावर ‘Salutary Judgement’ असा अग्रलेख लिहिला होता. एक मुलगी आणि एक वकील या दोन्ही भूमिकांतून मला तो महत्त्वाचा वाटतो.
माणूस विद्वान असला, श्रीमंत असला किंवा गुणी असला, तरी तो माणूस म्हणून कसा आहे ते महत्त्वाचं. आईवडिलांची सेवा करणारा मुलगा, पत्नीचा मान राखणारा पती, मुलांवर माया करणारे वडील, मित्रावर भावासारखे प्रेम करणारे मित्र, धाकट्या भावंडांची काळजी घेणारा मोठा भाऊ, आधार देणारे काका, अतिशय जागरूक नागरिक, व्यासंगी आजोबा… बाबांची ही सगळी रूपं अतिशय लोभस आहेत. इतका मोठा माणूस वडील म्हणून लाभणं हे भाग्यचं आहे!