जीवनपट

न्या . नरेन्द्र चपळगावकर

नरेन्द्र चपळगावकर यांच्या वाङ्‍मयीन जीवनाचा प्रारंभ ललित वाङ्‍मयाच्या निर्मितीने म्हणजे कविता – कथा लेखनाने झाला. कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटके यांचे वाचन आणि त्यावर चर्चा हे त्यांचे प्रारंभीचे वाङ्‍मयीन जीवन होते. तारुण्याच्या प्रारंभकाळातच त्यांनी गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि श्री. पु. भागवत यांच्याशी ओळख करून घेतली. पुढे त्यांचा या सर्वांशी स्नेहही जडला.
चपळगावकर प्रारंभापासून राजकारणात, सार्वजनिक जीवनात वावरले, तरी त्यांचा कल यासंबंधीच्या तात्त्विक- वैचारिक अभ्यासाकडे नव्हता. वैचारिक वाङ्‍मयापेक्षा त्यांना ललित वाङ्‍मयाचे आकर्षण होते. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी नमूद केले आहे की, ‘१९५५-५७ हा काळ चांगले वाङ्‍मय काय असते हे कळून घेण्याचा माझा काळ होता. ललितलेखनाची चिकित्सा करावी, ते आपल्याला का आवडले हे तपासावे, त्याचे गुणदोष पाहावे ही प्रक्रिया पुढे म.भि. चिटणीसांच्या आणि नंतरच्या काळात वा.लं.च्या शिकविण्यातून दृढ होत गेली. ‘
नंतरच्या काळात मात्र चपळगावकर यांच्या वाचनाचे केंद्र बदलले. सामाजिक इतिहास, राजकारण, समाजकारण आणि कायदा यासंबंधीच्या तात्त्विक वैचारिक वाङ्‍मयात ते रस घेऊ लागले, तर्ककठोर चिकित्सा करण्यात रमू लागले. हैदराबाद संस्थानाबद्दल, हैदराबाद मुक्तिलढ्याबद्दल महाराष्ट्रात फार मोठे अज्ञान आहे, या जाणिवेतून त्यांनी हैदराबाद मुक्तिलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांचे चरित्र लिहिले. ते मराठीतल्या उत्तम चरित्रांपैकी एक आहे. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला. ‘संस्थानी माणसं’ हे हैदराबाद संस्थानाचा इतिहास घडविणाऱ्या व्यक्तींच्या शब्दचित्रांचे त्यांचे पुस्तकही महत्त्वाचे आहे. यासंबंधाने त्यांनी मौलिक लेखन केले. त्यातून ‘दीपमाळ’ हे पुस्तक साकारले. मराठवाड्याचा वाङ्‍मयीन इतिहास हे चपळगावकर यांचे दुसरे अभ्यासक्षेत्र. महाराष्ट्राचे एकोणिसावे शतक हेही त्यांचे आणखी एक अभ्यासक्षेत्र होय. एकोणिसाव्या शतकातील नागरी समाज घडविणाऱ्या चळवळींचा शोध घेत न्यायमूर्ती महोदव गोविंद रानडे, न्या. तेलंग, न्या. चंदावरकर, गोपाळ कृष्ण गोखले हेही त्यांच्या अभ्यासाचे विषय झाले. त्यातून महत्त्वाच्या ग्रंथांची निर्मिती झाली. टिळकांच्या राजकीय जीवनातील स्फोटक भागाऐवजी त्यांच्यातल्या विधायक प्रवृत्तीविषयी लिखाणावर त्यांनी भर दिला. याशिवाय महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांवर लिखाण करताना त्यांच्यातल्या चांगल्या बाबी चपळगावकर यांनी समोर आणल्या.
चपळगावकर यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या दोन दशकांत विपुल लेखन केले. त्यातून गेल्या दोन दशकांत त्यांची अनेक पुस्तके वाचकांसमोर आली. अलीकडच्या काळात त्यांनी प्रत्ययकारी व्यक्तिचित्रे लिहिली. त्यांतील काही महत्त्वाच्या व्यक्तिचित्रांचा समावेश असलेले ‘मनातली माणसं’ हे त्यांचे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. त्यातील तत्कालीन हैदराबाद राज्याचे गृहमंत्री दिगंबरराव बिंदू यांच्यावरील लेख महत्त्वाचा होय. हैदराबाद संस्थानातल्या सत्ताधाऱ्यांच्या आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या व्यक्तींच्या रेखाटनात त्यांचे जसे लालित्य समोर येते तसेच त्यातून ऐतिहासिक सत्यही दिसते.
चपळगावकर यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी झुंजार पत्रकार अनंतराव भालेराव यांचे चरित्र २०१२-२०१३ च्या दरम्यान लिहिले होते. नंतरच्या काळात त्याचाच विस्तार करून त्यांनी ‘अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व’ हे विस्तारित चरित्र मराठी वाचकांपुढे ठेवले. २००४ साली दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी लेखनाचे अनेक विषय मनात आहेत, लिहिण्यासारखे पुष्कळ आहे. कधी जुन्या इतिहासाकडे, कधी एकोणिसाव्या शतकाकडे, एखाद्या व्यक्तीच्या काळाआड लपलेल्या कर्तृत्वाकडे, कधी जीवनाच्या एखाद्या विभ्रमाकडे लक्ष जाते आणि आपण याबद्दल काही लिहावे, असे वाटत असल्याचे सांगितले होते. त्यानंतरच्या एक तपात त्यांनी वरील मनोदयानुसार लेखन करून मराठीतील वैचारिक साहित्यात मौलिक भर घातली. त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांना प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन या संस्थेने त्यांना सन २०१८ साली जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यापाठोपाठ त्यांना राजहंस प्रकाशनाचा वैचारिक लेखनासाठी असलेला श्री. ग. माजगावकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

माहिती

  • नरेन्द्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म १४ जुलै १९३८ बीड येथे झाला.
    (वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते).
  • प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण बीड येथे.
  • एल. एल. बी. आणि एम.ए. (मराठी) या दोन्ही पदवी परीक्षांत पहिला वर्ग.
  • दयानंद महाविद्यालय, लातूर येथे एक वर्ष मराठीचे प्राध्यापक. 
  • त्यानंतर औरंगाबादच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात काही काळ कायद्याचे अध्यापन.
  • जून १९६२ पासून वकिली व्यवसायात पदार्पण.
  • बीड, मुंबई आणि औरंगाबाद येथे २८ वर्षे वकिली केल्यानंतर १९ जानेवारी १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड. 
  • १० एप्रिल १९९९ रोजी या पदावरून निवृत्त.
  • त्यानंतर ‘माहितीचा कायदा’ तयार करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे सभासद आणि सरकारचे सामाजिक उत्तरदायित्व निश्चित करणारा कायदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष.
  • मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे सुमारे पंधरा वर्षे सभासद, विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे आठ वर्षांहून अधिक काळ सभासद, राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे काही काळ सभासद.
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे पंचवीस वर्षांहून अधिक काळ सभासद. सुमारे बारा वर्षे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष. आता विश्वस्त मंडळाचे सभासद.
  • धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाचे पाच वर्षे अध्यक्ष.
  • नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पाच वर्षे विश्वस्त व नंतर अध्यक्ष.
  • वाईच्या प्राज्ञपाठशाळेच्या नियामक मंडळाचे गेली पंधरा वर्षे सभासद. औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळाचे सुमारे तेरा वर्षांपासून सभासद.
  •  हैदराबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ स्मृती- संशोधन प्रतिष्ठानाचे एक सभासद
  • भारतीय जलसंस्कृती मंडळ या पाणी आणि संस्कृती यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास करणाऱ्या, परंपरेच्या आधारे पाण्याचे जीवनातील महत्त्व लोकांना पटावे म्हणून लोकजागृतीचा प्रयत्न करणाऱ्या, जलविषयक साहित्याचा पुरस्कार करून वाचक आणि लेखक यांना एकत्र आणणारी जलसाहित्य संमेलने भरवणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष. या संस्थेत श्री. माधवराव चितळे आणि इतर सहकाऱ्यांवरोबर काम.
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने माजलगाव येथे २००५ साली भरलेल्या २६व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
  • मानवत येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगीचे मुख्य भाषण.
  • परिषदेचे मुखपत्र ‘प्रतिष्ठान’मध्ये वाङ्‍मयीन समीक्षा आणि इतर लेखन. 
  • मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांचे संपादन व त्या पुस्तकास निजामी काळातील मराठी वाङ्‍मयाचा चिकित्सक आढावा घेणारी प्रदीर्घ प्रस्तावना.
  • अनेक वाङ्‍मयीन चर्चासत्रांत उद्‍घाटनपर भाषणे.
  • मराठी समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारण यांचे अभ्यासक, तिन्ही विषयासंबंधी अनेक नियतकालिकांत आणि संशोधनपत्रिकांमध्ये निबंधलेखन.
  • लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मराठवाडा, साधना, देशदूत आणि India Legal या नियतकालिकांतून लेखन.
  • ‘समाज आणि संस्कृती’, ‘तुमच्या माझ्या मनातलं’ ‘कायदा आणि माणूस’ ही या लेखनाची पुस्तके प्रसिद्ध.
  • समाजप्रबोधनपत्रिका, नवभारत, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर Critical Enquiry आदींमधून सामाजिक प्रश्नांवर लेखन.
  • Law of Election हे निवडणूक कायद्याविषयीचे पुस्तक इंडियन लॉ रिपोर्टर नागपूरतर्फे प्रसिद्ध. (दोन आवृत्त्या)
  • अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा’ हे मराठी पुस्तक भारत मुद्रक आणि प्रकाशक लि. औरंगाबादतर्फे प्रसिद्ध.
  •  कायदेविषयक, चरित्रविषयक आणि इतर विषयांवरील अनेक पुस्तकांना प्रस्तावना.
  • Hon. Jagannath Shankarshet : Prophet of India’s Resurgence and Maker of Modern Bombay या प्रकाश पांडुरंग शिरोडकर यांच्या त्रिखंडात्मक चरित्रग्रंथाला प्रस्तावना.
  • हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ‘कर्मयोगी संन्यासी’ या चरित्राचे लेखन. मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार.
  • भारतीय राज्यघटनेच्या पन्नास वर्षांच्या अंमलबजावणीची चिकित्सा करणाऱ्या ‘राज्यघटनेचे अर्धशतक’ (मौज प्रकाशन) या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक.
  • ‘विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन’ हे पुस्तकही मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध.>
  • ‘सावलीचा शोध’ हे महाराष्ट्रात आलेल्या प्रॉटेस्टन्ट मिशनऱ्यांच्या प्रारंभी काळासंबंधीचे पुस्तक. मिशनरी आणि प्रारंभी धर्मांतर केलेले काही मराठी यांच्या व्यक्तित्वाचा शोध.
  • ‘त्यांना समजून घेताना’ हे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आदींच्या परस्परसंबंधांचा शोध घेणारे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
  • ‘आठवणीतले दिवस’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मौजेने प्रसिद्ध केले आहे.
  • नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून गुणश्री प्राध्यापक (Emiritus Professor) म्हणून नियुक्तीने गौरव, सामाजिक शास्रे व मानव्यविद्याशाखेच्या समित्यावर सभासद म्हणून नियुक्ती. या विद्यापीठातून पीएच.डी.साठी मार्गदर्शक म्हणून मान्यता. विद्यापीठाच्या महात्मा गांधी विचार अभ्यास पदविकेसाठी पुस्तकाचे संपादन.
  • पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीने चालवलेल्या विधि महाविद्यालयातील फोर्ड अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून सुमारे दीड वर्ष काम. मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतील संशोधन प्रबंधांचे एक परीक्षक.
  • पुण्याच्या भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी (Indian School of Political Economy) च्या पुरस्काराने ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ या विषयावरील संशोधन-लेखन. न्या. काशीनाथ त्रिंबक तेलंग, न्या. महादेव गोविंद रानडे व न्या. नारायण गणेश चंदावरकर या तीन न्यायमूर्तीच्या राजकीय, सामाजिक, न्यायिक, आर्थिक व धार्मिक विचारांचा व कार्याचा तसेच या कालखंडातील मराठी समाजजीवनाच्या इतिहासाचा मागोवा घेणारा हा ग्रंथ आहे.
  • पुण्याच्या गंधर्ववेद प्रकाशनासाठी न्या. काशीनाथ त्रिंबक तेलंग यांच्या चरित्रग्रंथाचे लेखन. ‘मराठवाडा’चे संपादक अनंत भालेराव यांचे चरित्र २०१८ साली प्रसिद्ध झाले.
  • नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी ‘महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’ हे पुस्तक लिहिले. पुस्तकाची दुसरी आवृत्ती समकालीन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कायदा, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मराठी वाङ्‍मय, समाजेतिहास या विषयांत तसेच महात्मा गांधींचे विचार आणि कार्य यांच्या अभ्यासात विशेष रस.
  •  राजहंसचा ‘श्री. ग. माजगावकर स्मृती’ वैचारिक लेखनासाठीचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार.

महत्त्वाची पुस्तके :

अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा

(१९७४)

भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

(१९९१)

निवडणुकीचा कायदा

(१९९४)

राज्यघटनेचे अर्धशतक

(२००२)

तुमच्या माझ्या मनातलं

(२००३)

समाज आणि संस्कृती

(२००६)

न्या. काशिनाथ त्र्यंबक तेलंग

(२०१०)

सावलीचा शोध

(२०१२)

म. गांधी आणि भारतीय राज्यघटना

(२०१३)

न्यायाच्या गोष्टी

(२०१३)

न्या. केशवराव कोरटकर

(२०१५)

संघर्ष आणि शहाणपण

(२०१७)

नामदार गोखल्यांचा भारतसेवक समाज

(२०१७)

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी - नेतृत्त्वाची सांधेजोड

(२०२०)